Ravi Rana : अमरावतीत आज महिलांना मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्‍या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना, आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतरुपी आशीर्वाद न दिल्यास, लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये खात्यातून काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं होतं. या विधानावर विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता आमदार राणा यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले रवी राणा?

मी गंमतीने ते विधान केलं होतं. त्यानंतर अनेक महिला हसत होत्या. बहीण भावाचं नातं हे गमतीचं असलं पाहिजे. मात्र, विरोधात माझ्या विधानाचा बाऊ करत आहेत. कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्यातल्या लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. येत्या १७ तारखेला या महिलांच्या खात्यात सरकारद्वारे तीन हजार रुपये जमा करण्यात येईल, असं स्पष्टीकरण रवी राणा यांनी दिलं.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “रवी राणा जे बोलले, तेच सरकारच्या मनात”, लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल; म्हणाले…

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. विरोधकांनी नको त्या गोष्टीचा बाऊ करू नये. पैसे परत घेण्याचं तर सोडा, मी माझ्या भाषणात सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवावे अशी मागणी केली आहे. तसेच आशा सेविकेचे मानधन वाढवावे, असे मी म्हटलं आहे. मुळात विरोधकांनी चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे, कोणत्याही विधानाचा राजकीय फायदा घेऊ नये, भाऊ हा नेहमी बहिणीला देत असतो, तिच्याकडून काही घेत नाही, हे विरोधकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं रवी राणा म्हणाले.

रवी राणांनी नेमकं काय विधान केलं होतं?

“सरकारने महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन”, असं आमदार रवी राणा म्हणाले होते. रवी राणांच्या या विधानानंतर उपस्थित महिलांमध्ये जोरदार हशाही पिकल्याचं बघायला मिळालं होतं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clarification by ravi rana over ladki bahin money return statement spb
Show comments