अमरावती : अंजनगाव सुर्जी येथे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमानंतर रवी राणा यांचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युवा स्वाभिमान पक्षातर्फे अंजनगावात सोमवारी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम आटोपून आमदार राणा व कार्यकर्ते अमरावतीकडे जाण्यासाठी निघाले असताना नवीन बसस्थानक परिसरातील अग्रसेन चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख महेंद्र दिपटे यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. आमदार राणा व त्यांच्या कार्यकर्त्यानी महेंद्र दिपटे यांना जबर मारहाण केल्याचे सांगण्यात आले, तर महेंद्र दिपटे यांनी रवी राणा यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा >>वर्धा: अवैध वृक्षतोड निषेधार्थ पर्यावरणप्रेमीने फेसबुक लाईव्ह करीत घेतली विहिरीत उडी, मग प्रशासनाने…

आमदार राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कार्यक्रमात अपशब्द वापरल्यावरून हा वाद झाल्याचे समजते. आमदार राणा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. महेंद्र दिपटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यासमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी केली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते. याप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clash between activists of ravi rana and activists of shiv sena thackeray group amravati mma 73 amy