लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रावरसुद्धा होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वातावरण कोरडे झाले असून किमान तापमानात देखील घट होत आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असून पुढील दोन दिवस ही थंडी कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

देशाच्या उत्तरेकडील राज्यात थंडी कमी होण्याचे नावच घेत नाही. दिवसेंदिवस या राज्यांमधील किमान तापमानात घट होत असून थंडीचा कडाका वाढत चालला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचे सावट असणाऱ्या महाराष्ट्रातसुद्धा किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमधील थंडीचे पडसात महाराष्ट्रात उमटत असून अनेक ठिकाणी वातावरण कोरडे झाले आहे.

आणखी वाचा-‘रेल्वे रोको’पूर्वीच शर्वरी तुपकरांसह कार्यकर्ते ताब्यात

थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात देखील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राला या शीतलहरींचा अधिक फटका बसत आहे. येथेही किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली घसरत आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात थोडीफार चढउतार होत असली तरीही बोचरे वारे वाहू लागले आहेत. चार भिंतीच्या आत थंडी कमी, पण बाहेर पाऊल टाकल्यावर मात्र बोचऱ्या वाऱ्यांचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गरिबांसाठी थंडीपासून दिलासा मिळण्याचे साधन असलेल्या शेकोट्या आता पुन्हा एकदा पेटायला लागल्या आहेत. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात हा गारठा आणखी वाढणार असून किमान दोन ते तीन दिवस तो कायम राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

आणखी वाचा-गडचिरोली : दोन महिलांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद

पुण्यातही तापमान नऊ अंशापर्यंत गेले असून उर्वरित भागातही ते दहा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज आहे. देशभरातच सध्या थंडी आणि धुक्याची चादर दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश, काश्मिरचे खोरे, उत्तराखंड या राज्यांमध्ये किमान तापमानात घट कायम असून काही ठिकाणी त्यात किंचित वाढ दिसून येत आहे. तर झारखंड, पंजा, चंदीगढ, पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा या राज्यांमध्ये धुक्याची चादर कायम राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. राजस्थान, उत्तराखंड, मध्यप्रदेशचा उत्तरेकडील भागात येत्या २४ तासात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold will increase in maharashtra predicts the indian meteorological department rgc 76 mrj