नागपूर: काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोन्ही विरोधी विचारधारेचे आहेत हे जगजाहीरच आहे. मात्र, असे असतानाही काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्याने विरोध डावलून संघ शिक्षा वर्गाला परवानगी दिली होती, असा दावा स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्व. दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी समारोह कार्यक्रम नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी होसबळे यांनी दत्ताजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्याने संघ शिक्षा वर्गाला कशी मदत केली होती ही आठवण सांगितली. तामिळनाडूमध्ये संघाचे प्रचारक दत्ताजी डिडोळकर १९५६च्या दरम्यान काम करत होते. यावेळी चेन्नई येथे संघ शिक्षा वर्ग घेण्यात येणार होता. त्यासाठी मैलापूर येथील विवेकानंद शासकीय महाविद्यालयाची निवड करण्यात आली.

हेही वाचा >>> अमित शाहांच्या भेटीबाबत अजित पवार म्हणाले, “जयंत पाटील हे…”

सुरुवातीला महाविद्यालय जागा देण्यास तयार होते. मात्र नंतर महाविद्यालयातील काही लोकांनी शासकीय महाविद्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर दत्ताजींनी तत्कालीन मुख्यमंत्री कामराज यांची भेट घेतली. ते काँग्रेसचे वरिष्ठ नेता होते. त्यांनी तात्काळ संघशिक्षा वर्गाला परवानगी दिली. कारण मुख्यमंत्री कामराज चतूर होते. संघाच्या कार्यक्रमाला नकार देऊन नकारात्मक प्रसिद्ध करून घेण्यापेक्षा कार्यक्रम होऊ देणे कधीही सोईस्कर राहिल हा विचार करून त्यांनी कार्यक्रमाला परवानगी दिली होती, असेही होसबळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress chief minister the allowed to sangh siksha class claim by dattatreya hosbale dag 87 ysh