नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही संघाची “मूंह में राम, बगल में छुरी” ही भूमिका अजूनही कायम आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. संविधान व गांधी विचारांना समर्पित ‘संविधान सत्याग्रह पदयात्रे’ची यशस्वी सांगता सेवाग्राम आज येथे झाली. दीक्षाभूमीपासून निघालेल्या या पदयात्रेतून संघाच्या कार्यपद्धतीचा तीव्र निषेध करण्यात आला आणि आणि संविधानिक मूल्य पुनर स्थापित करण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला.
सपकाळ म्हणाले, “संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांचा खरा चेहरा बदललेला नाही. गांधींच्या जयंतीदिनी, दसऱ्याच्या दिवशी आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही स्पष्टपणे सांगतो की गांधी होते म्हणून देश अखंड राहिला. पण आजही संघ गांधींविरोधात अपप्रचार करत आहे. देशाच्या फाळणीला गांधी जबाबदार होते आणि पाकिस्तानला ५५ कोटी दिले, हे सांगणे म्हणजे इतिहासाचा विद्रूपीकरण आहे.”
कार्यक्रमात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, भगतसिंह यांचे भाचे प्रो. जगमोहन, विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनिल केदार, खासदार अमर काळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भान आदी उपस्थित होते.
विजय वडेट्टीवार यांनी संघ व भाजपवर जोरदार टीका करताना म्हटले की, “ज्यांनी तिरंगा फडकवण्यास विरोध केला, त्यांच्याकडून देशभक्ती शिकवली जात आहे. देश सर्वांचा आहे, संविधान सर्वांना समभावाने वागवते. पण गेल्या ११ वर्षात देशात द्वेषाचे विष पेरले गेले आहे. प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी जातीधर्माच्या नावाने राजकारण चालले आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यसैनिक जी. जी. पारीख यांना श्रद्धांजली अर्पणाने झाली. त्यांच्या कार्याची आठवण काढत सपकाळ म्हणाले की, “पारीख यांचे जीवन हे सामाजिक न्याय, समता याचे प्रतीक होते. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून ही पदयात्रा सुरू करण्यात आली.”
काँग्रेसने संघाच्या १०० वर्षांच्या पार्श्वभूमीवर संविधान, समता आणि गांधी विचारांची ताकद दाखवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुन्हा संविधानाची प्रत स्वीकारण्याचे आवाहन केले. “नाही घेतले, तर पुन्हा येऊ – हा आमचा निर्धार आहे,” असे स्पष्ट करत काँग्रेसने आगामी वर्षभर पदयात्रा सुरू ठेवण्याचा इशाराही दिला.
युवक काँग्रेसचे पदाधिकारी संविधानाची प्रत घेऊन संघाचे मुख्यालय रेशीम बागेकडे जात असताना त्यांना अटक करण्यात आली. संघाला १०० वर्ष होत असताना परवाच संघाने नागपूरच्या व्हरायटी चौकात महात्मा गांधी यांना अभिवादन केले, ज्यांचा सर्वात जास्त वेळ महात्मा गांधी यांना बदनाम करण्यात गेला त्यांना गांधीजींनाच शरण जावे लागले हा संघाचा वैचारिक पराभव आहे, त्यांनी आता संविधान स्विकारावे व संविधानाला अभिप्रेत देश निर्माण करण्यासाठी काम करावे. तसेच गांधी विचार स्विकारावा हे आमचे आवाहन होते पण आज युवक काँग्रेसचे पदाधिकारी संविधानाची प्रत घेऊन संघाचे मुख्यालय रेशीम बागेकडे जात असताना त्यांना अटक करण्यात आली. आज अटक करण्यात आली असली तरी पुन्हा एनएसयुआयच्या हाती संविधान देऊन पाठवू आणि नाही घेतले तर ३० जानेवारीला गांधी पुण्यतिथीदिनी महिला पदाधिकारी जातील आणि तेव्हाही घेतले नाही तर १४ एप्रिलला पुन्हा त्यांना संविधान देण्याचा प्रयत्न करू. आरएसएस विसर्जित करा ही मागणी घेऊन वर्षभर पदयात्रा काढू, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बोलून दाखवला.