अकोला : पारस येथील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. ज्यासाठी जमीन अधिग्रहित केली, तोच विस्तारित औष्णिक प्रकल्प उभारण्यासाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अभिलाष तायडे यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता शरद भगत यांची भेट घेऊन औष्णिक प्रकल्प होण्यासाठी त्यांना निवेदन सादर केले. पारस येथे २०११ मध्ये नवीन विस्तारित औष्णिक प्रकल्पासाठी ११०.९१ हेक्टर शेतजमीन औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी अधिग्रहित केली होती. त्या जागेवर अद्यापही औष्णिक प्रकल्प उभारण्यात आला नाही. आता महानिर्मितीच्यावतीने अधिग्रहित जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्या जात आहे. जमिनीचे अधिग्रहण करताना औष्णिक प्रकल्पासाठी घेतल्या गेली. त्याठिकाणी औष्णिक प्रकल्प न उभारता सौर ऊर्जा प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. हा शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप अभिलाष तायडे यांनी केला.

हेही वाचा – “शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत मात्र सरकार विरोधी पक्ष फोडण्यात व्यस्त”, अनिल देशमुख यांची टीका, म्हणाले…

राज्यात विविध ठिकाणी ६६० मेगावॉट औष्णिक विद्युत प्रकल्प उभारले जात आहेत. त्याठिकाणी स्थानिकांचा विरोध असतानासुद्धा औष्णिक प्रकल्प उभारत आहेत. पारस येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यासाठी पोषक वातावरण व शेतकऱ्यांचे सहकार्य असतानासुद्धा येथे सौर प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न होत आहेत. काँग्रेसचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी मंत्रिपद न घेता बेरोजगारी कमी व्हावी म्हणून पारस येथे औष्णिक प्रकल्प खेचून आणला. आता सरकार विस्तारित प्रकल्प उभारण्यास टाळाटाळ करीत आहे. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला जात नसेल तर त्याचा निषेध रस्त्यावर उतरून केला जाईल. अधिग्रहित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासह औष्णिक प्रकल्प उभारणीसाठी मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा तायडे यांनी दिला.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू जैनचे पैसे लपविणाऱ्या मित्राला अटक, बंटी कोठारीला ८ दिवसांची कोठडी

यावेळी बाळापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक पोहरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक काळपांडे, तालुका महासचिव रामराव खोपडे, रमेश भगत, महेश तायडे, राहुल राऊत, जय गायकवाड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress opposes solar power project at paras urges for expanded thermal project ppd 88 ssb