चंद्रपूर : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण बालपणापासून मुलीला देणाऱ्या चिमूर तालुक्यातील गिरोला गावातील गोकुलदास आणि कांता खोब्रागडे या गरीब शेतमजुराची मुलगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमपीएससी परिक्षेत यश मिळविणाऱ्या या कर्तबगार मुलीचे नाव आहे तनुजा खोब्रागडे. तिच्या यशामुळे गिरोला हे शंभर लोकवस्तीचे गाव राज्यात चर्चेला आले आहे. ग्रामीण भागामध्ये आजही मुलगी दहावी बारावी झाली की, तिचे शिक्षण थांबविण्यात येते. तिच्या लग्नाचा विचार सुरू होतो. मात्र, ज्या आई वडिलांना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे समजले ते स्वतः कष्ट घेऊन मुलींना पुढील शिक्षण देतात.

हेही वाचा – अमरावती : सौदी अरेबियात नोकरीचे आमिष; बेरोजगारांची ४ लाखांची फसवणूक

गिरोला येथील शेतमजूर असलेल्या गोकुलदास आणी कांताबाई खोब्रागडे यांनी मुलगी तनुजा हिला वाढविले. तनुजाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. वर्ग ४ थी ते ७ वी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरी, ८ वी ते १० वी कर्मवीर विद्यालयात सावरी येथे झाले. दहावीत शाळेत प्रथम आल्याने राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीचा तनुजाला लाभ मिळाला. ११ वी ते १२ वीचे शिक्षण शेगाव येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात झाले. बारावी झाल्यानंतर कुठे शिक्षण घ्यावे, असा प्रश्न तुनजासमोर होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने चंद्रपुरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकण्याचा निर्णय घेतला.

आपल्या भावाकडे राहून तिने पुढील शिक्षण घेण्याचे ठरविले. आयटीआयनंतर येथील सरदार पटेल महाविद्यालयात इंग्रजी साहित्यात बी. ए. आणि एम.ए.ची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेची कोणतीही तयारी न करता एम.ए.ला असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यामुळे यश संपादन करता आले नव्हते. पदवीत्तोर शिक्षण झाल्याबरोबर आई व्यथित करीत असलेले जीवन आपल्याही वाट्याला येऊ नये तसेच आई वडिलांच्या कष्ठाचे चीज व्हावे म्हणून जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यासातील सातत्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश खेचून आणले.

हेही वाचा – नागपूर : कोराडी वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलर ट्यूब लिकेजमुळे २१५ दशलक्ष वीज युनिट्सचे नुकसान!

गावात शासकीय नोकरीपर्यंत कुणीही पोहोचले नसताना पोलीस अधिकारीपद मिळविल्याने तनुजाचे गावात व परिसरात अभिनंदन केले जात आहे. तनुजाने अतिशय परिश्रमपूर्वक गरिबीवर मात करित यश संपादन केल्याने तिच्या यशाचे कौतूकही सर्वच स्तरांतून होत आहे.

आई, वडील आणि भावासह कुटुंबाचा तथा गुरूंचा संपूर्ण पाठिंबा मिळाल्याने मला हे यश मिळवता आले. ग्रामीण भागातील मुलींनी आईवडिलांचे कष्ट, दारिद्र्य आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून जिद्दीने शिक्षण घ्यावे. शिक्षणातून येणाऱ्या आत्मविश्वासाने, सातत्यपूर्ण अभ्यासाने यश नक्कीच मिळते. तरुण तरुणींनी मन लावून अभ्यास करावा. – तनुजा खोब्रागडे, पोलीस उपनिरीक्षक, गिरोला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daughter of farm laborer turned psi tanuja khobragade succeeds in mpsc exam rsj 74 ssb