अकोला : दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीचे सर्वांनाच विशेष आकर्षण असते.यंदा विविध प्रकारचे नवे फटाके बाजारात दाखल झाले आहेत. फटाक्याच्या किंमतीत किरकोळ दरवाढ झाली असतांनाही मागणीत वाढ नोंदवल्या जात आहे. सणांचा राजा म्हणून ओळख असलेली दिवाळी सुरू झाली. खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. दिवाळी म्हटली की फटाके आलेच.

यंदा नागरिकांमधील उत्साह लक्षात घेता फटाक्यांची विक्री वाढून मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यातच विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमती यंदा थोड्या प्रमाणात वाढल्याचे घाऊक विक्रेत्यांनी सांगितले. सुतळी बॉम्ब, बुलेट बॉम्ब, पोपट, लवंगी आदी आवाजांच्या फटाक्यांसह फुलझड्या, झाड, चक्री, रॉकेट, स्काय शॉट आदी खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. आकाशात उडणाऱ्या फटाक्यांची विशेष मागणी होत आहे.

यावर्षी फटाक्यांच्या किंमतीमध्ये किरकोळ वाढ झाली. फटाके निर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, अल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्चा मालाचा वापर केला जातो. यापैकी अनेक गोष्टीच्या किंमतीमध्ये वाढ झाली. शिवाय कामगारांची वाढलेली बेसुमार मजुरी तसेच डिझेल-पेट्रोलच्या किंमतीतील सततच्या वाढीमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च, विजेचे वाढलेले दर या सर्व बाबींमुळे फटाक्यांच्या किंमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. शिवाय दारुगोळा आणि रसायनांच्या किमती वाढल्याने शिवकाशी येथून मागविलेले फटाके वाढीव दराने बाजारपेठेत आले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

फटाक्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार

फटाक्यांमध्ये रॉकेट, फुलझाड, फुलबाजी, ग्राउंड स्पिनर, धूमकेतू, हवाई गोळे, बॉम्ब आणि इलेक्ट्रिक फटाके यांसारख्या अनेक प्रकारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ग्रीन क्रॅकर्स (हरित फटाके) हे पर्यावरणास कमी हानी पोहोचवणारे असून त्यातही फुलबाजी, फ्लॉवरपॉट आणि स्काय शॉट यासारखे प्रकार आहेत. बाजारात यंदा अनेक नवीन प्रकार दाखल झाले आहेत. यामध्ये असंख्य प्रकारच्या बंदुका, बिडी फटाका, हेलिकॉप्टर फटाका आणि फोटो फ्लॅश यांचा समावेश आहे. तसेच, रंगीबेरंगी झाड (कलर ट्री), रिसायकल व कलर फुल्ल चाकरी, कलर स्मोक, हॅण्ड शोट, मेरी गो राऊंड आणि पॅराशूट रॉकेट यांसारख्या वैविध्यपूर्ण फटाक्यांचीही विक्री सुरू आहे. बाजारपेठेत फटाक्यांची खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यावर्षी पारंपरिक सुतळी बॉम्बसह नव्या प्रकारच्या फटाक्यांना अधिक मागणी होत आहे. फटाका बाजारपेठेत मोठे गर्दी उसळली.