नागपूर : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहायक आहे, असे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी किमान सहा आमदारांकडे मोठय़ा रक्कमेची मागणी झाल्याचे उघड झाले आहे. यात राज्यातील चार आमदारांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील भाजपचे ज्येष्ठ आमदार विकास कुंभारे यांना काही दिवसांपूर्वी फोन आला. त्याने स्वत:चे नाव निरज सिंह राठोड असल्याचे सांगून स्वत:ची ओळख भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक अशी करून दिली. आपल्याला मंत्रीपद द्यायचे असून पक्षनिधीसाठी जवळपास पावणेदोन कोटी रुपये जमा करावे लागतील. रक्कम मिळाल्यानंतर मंत्रीपद निश्चित केले जाईल, अशी हमी त्याने दिली. कुंभारे यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी निरज सिंह राठोड याला मोरबी, अहमदाबाद येथून अटक केली. टेकचंद सावरकर, तानाजी मुरकुटे आणि नारायण कुचे या राज्यातील आणखी तीन आमदाराकडे निरजने कोटय़वधींची मागणी केल्याचे समोर आले आहे.

दोघांनी मोठी रक्कम दिली?

नीरजसिंह राठोड याने दोन आमदारांना दूरध्वनी केला व जे.पी. नड्डा यांचा हुबेहूब आवाज काढणाऱ्या युवकाशी बोलणे करून दिले. त्यानंतर त्यांनी  काही कोटी रुपये निरजच्या हवाली केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demanding money from bjp mlas for ministerial post ysh