गेल्‍या दोन दिवसांत पश्चिम विदर्भातील पाच जिल्‍ह्यांमध्‍ये झालेल्‍या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे २४२ गावे बाधित झाली असून ७ हजार ४०० हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण ७ हजार ५९६ शेतकऱ्यांना त्‍याचा फटका बसला आहे. ३ हजार २४६ हेक्‍टरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, उर्वरित उद्यापर्यंत पूर्ण केले जातील आणि शेतकऱ्यांना तत्‍काळ मदत दिली जाईल, असे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले

सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. आधी ६५ मि.मी. पेक्षा जास्‍त पाऊस झाल्‍यास शेतीपिकांचे पंचनामे केले जात होते, पण आता नुकसानीसाठी पावसाची व्‍याख्‍या बदलवण्‍यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>>वर्धेत सार्वजनिक ठिकाणी जुगार, जिल्हा होतोय जुगार अड्ड्याच आगार

अवकाळी पावसाचे संकट राज्‍याच्‍या वेगवेगळ्या भागात आहे. वातावरणातील बदलांमुळे वेगळे चित्र निर्माण झाले आहे. विशिष्‍ट गावे, तालुक्‍यातील काही भाग अवकाळी पावसामुळे बाधित होत आहे. आतापर्यंत अमरावती विभागात दोन वेळा अशा प्रकारची नैसर्गिक आपत्‍ती आली आहे. शेतकऱ्यांना मदत दिली जात असून गेल्‍या दोन दिवसांतील अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले, त्‍याची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तसेच, हवामान खात्‍याकडून येत्‍या २१ एप्रिलला अंतिम अंदाज प्राप्‍त होणार आहे. त्‍यावर मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत चर्चा केली जाईल आणि सरासरीपेक्षा कमी पर्जन्‍यमान अपेक्षित असेल, त्‍या अनुषंगाने उपाययोजना केल्‍या जातील, असे फडणवीस म्हणाले.