नागपूर : टाटा समूहाच्या नागपूर येथील टाल मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्स लिमिटेड (TAL Manufacturing Solutions Ltd.) या महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पाचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमधील टाटा-एअरबस विमाननिर्मिती प्रकल्पासाठी नागपूरमधील टाल प्रकल्पात महत्त्वाचे सुटे भाग आणि उपकरणे तयार केली जाणार आहेत. त्यामुळे नागपूर पुन्हा एकदा देशातील औद्योगिक नकाशावर केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.
टाटा-एअरबस प्रकल्प हा भारतातील संरक्षण व नागरी विमाननिर्मिती क्षेत्रातील पहिला मोठा खासगी उद्योग आहे. वडोदरा येथे सुरू झालेल्या या प्रकल्पाअंतर्गत सी-२९५ एमडब्ल्यू या आधुनिक परिवहन विमानांचे उत्पादन होणार आहे. या विमानांच्या निर्मितीसाठी लागणारे अनेक घटक, सब-असेम्ब्ली व तपासणी यंत्रणा नागपूरमधील टाल प्रकल्पात विकसित करण्यात येतील. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक व कौशल्याधारित रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
अलिकडेच टाटा सन्सचे अध्यक्ष नागपूर दौर्यावर आले होते. त्यांनी सोलार ग्रुपच्या शस्त्र व दारुगोळा निर्मिती कारखान्याला भेट दिली. या भेटीदरम्यान संरक्षण क्षेत्रात टाटा समूह गुंतवणुकीचा विचार करत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, अधिकृत घोषणा कंपनीकडूनच करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. या भेटीसाठी राज्य सरकारने विशेष समन्वय साधला होता, अशी माहितीही समोर आली आहे.
दिवाळी मिलनाच्या निमित्ताने रामगिरी येथील निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाल प्रकल्पाच्या विस्ताराबाबत संकेत दिले. त्यांनी सांगितले की, गुजरातमधील विमाननिर्मिती प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागपूरमधील सुविधा मोठी भूमिका बजावतील. येथील प्रकल्पासाठी महत्वाचे सुटे भाग नागपुरातील टालमध्ये तयार केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी टाल प्रकल्पाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
टाल मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्स लिमिटेड ही कंपनी भारतातील औद्योगिक यंत्रसामग्री आणि घटक उत्पादन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. नागपूर येथील हा प्रकल्प टाटा समूहाच्या औद्योगिक सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो. कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण आणि नवोन्मेषी डिझाइनद्वारे देश-विदेशातील उद्योगांना उत्कृष्ट यंत्रसामग्री उपलब्ध करून देते.
Vertimach V-450 यांसारखी उच्च दर्जाची औद्योगिक मशीनरी कंपनी तयार करते. अचूकता, टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेसाठी ही उत्पादने प्रसिद्ध आहेत. टाल कंपनी ग्राहकांना विक्रीनंतरची सेवा व तांत्रिक सहाय्य देऊन उद्योगविश्वात विश्वासार्हता टिकवून ठेवते.
नागपूरमधील या प्रकल्पामुळे स्थानिक तंत्रज्ञ, अभियंते आणि लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. “मेक इन इंडिया” उपक्रमाला चालना देताना टाल कंपनीने देशांतर्गत उत्पादन क्षमतेत भर घातली आहे.
