वर्धा : प्रत्येकाचे एक श्रद्धास्थान असते. त्यास विविध प्रकारे पूजण्याचा प्रयत्न असतो. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे देश-विदेशात कोट्यवधी अनुयायी आहेत. बाबासाहेबांना अत्यंत पूजनीय मानून ते आपली नितांत श्रद्धा व्यक्त करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका कवीने म्हटले आहे की, माझ्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. ही अशी ओतप्रोत श्रद्धा थेट आपल्या बंगल्याच्या भाळी चितारण्याची कल्पना तर अफलातून म्हणावी. येथील व्यावसायिक नानाजी चहांदे यांचा बंगला बाबासाहेबांची सही कपाळावर मिरवत सर्वांचे लक्ष वेधत आहे. त्यांचा मुलगा दिल्लीत एका मोठ्या पदावर कार्यरत आहे. घराचे सुशोभीकरण झाल्यावर वरच्या भागात एक छानसा चौकोन तयार झाला होता. त्यावर काय रेखाटायचे, याची चर्चा झाल्यावर मुलाने बाबासाहेबांच्या स्वाक्षरीची कल्पना मांडली. या कुटुंबाचे स्नेही असलेले तसेच संविधानाचे स्वहस्ताक्षरात हस्तलिखित तयार करीत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झळकलेले मुख्याध्यापक धनंजय नाखले यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा – वर्धा : फायनान्स कंपनीचा तगादा; कर्जाने त्रस्त शेतकऱ्याने संपविले जीवन

विख्यात चित्रकार बंधू संजय व चंद्रकांत तीळले यांच्याशी त्यांनी गाठ घालून दिली. मग बाबासाहेबांच्या स्वाक्षरीचा शोध सुरू झाला. गूगलमार्फत विविध फाँटमधील स्वाक्षऱ्या टिपून त्या चहांदे कुटुंबास दाखविण्यात आल्या. पसंत आलेली स्वाक्षरी पाहून मग काम सुरू झाले. हे एक अवघड काम होते. कारण घराच्या अगदी वरच्या भागात ती स्वाक्षरी चितारण्यास बैठक नव्हती. म्हणून शिडीवर उभे राहून चितारणे सुरू केले. पाच फूट लांब व दोन फूट रुंद अशी ही स्वाक्षरी सकाळी दहा ते दुपारी पाच या वेळेत पूर्ण झाली. ऑईल पेंटमधील ही स्वाक्षरी दुरून पण लक्ष वेधते. हुबेहूब उमटली म्हणून तिळले यांची वाहवा होत आहे.

हेही वाचा – ठाकरे गटाकडून अकोल्यात सत्ताधाऱ्यांची कोंडी

नाखले म्हणतात की, स्वाक्षरीची कल्पना अत्यंत नाविन्यपूर्ण आहे. चित्रकार चंद्रकांत म्हणतात की, माझ्या आयुष्यात केलेले हे अपूर्व असे काम होय. त्यांनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे वर्ध्यात येणार असल्याचे कळल्यावर त्यांचे चित्र एका दिवसात तयार करून कलाम यांना स्वहस्ते भेट दिले होते. त्यांनी काढलेली दहा चित्रं प्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांच्या मुंबईतील संगीत अकादमीत लागली आहे. तसेच या कलेत पारंगत होण्याच्या सुरवातीला त्यांनी लॉर्ड बेडन पॉवेल यांचे चित्र काढले. ते आता मुंबईत स्काऊट गाईडच्या कार्यालयाची शोभा वाढविते. मात्र अत्यंत कष्ट घेत काढलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही स्वाक्षरी त्यांना कलेचे मोल झाल्याचे समाधान देणारी वाटते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor babasaheb ambedkar signature was created on a house in wardha pmd 64 ssb