नागपूर : प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर हे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या कक्षात कथित लैंगिक छळाच्या तक्रारीवर चर्चा सुरू असल्याचे भासवून खंडणीसाठी संपर्क साधत असल्याची नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या चौकशीसाठी ॲड. सुमित जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. धवनकर यांनी सात विभागप्रमुखांकडून मोठी रक्कम उकळल्याचे प्रकरण विद्यापीठ वर्तुळात सध्या गाजत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाच्या विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रवीणा खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीत डॉ. गणेश केदार, डॉ. पायल ठवरे आदींचा समावेश होता. मात्र, डॉ. प्रवीणा खोब्रागडे यांनीच या समितीतून माघार घेतल्यानंतर सोमवारी विद्यापीठाच्या अधिवक्ता गटावरील ॲड. सुमित जोशी यांची समिती स्थापन करण्यात आली. डॉ. धवनकर यांनी त्या सात प्राध्यापकांची फसवणूक कशाप्रकारे केली याची नवीन माहिती आता समोर आली आहे. धवनकर हे अनेकदा कुलगुरूंच्या कक्षात बसले असताना काही प्राध्यापकांशी संपर्क साधून कथित लैंगिक छळाच्या तक्रारीवर चर्चा सुरू असल्याचे सांगून धमकावत. तसेच अनेकदा कुलगुरूंच्या कक्षाबाहेर असलेल्या मोकळ्या मैदानात बोलावूनही भीती दाखवत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: महिलेने कानशिलात हाणल्यानंतरही प्रा. धवनकरची मग्रुरी कायम; खंडणी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

जनसंपर्क अधिकारी पदाचा गैरफायदा

डॉ. धवनकर यांच्याकडे विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी पदाचा प्रभार होता. त्यामुळे कामानिमित्त त्यांचा थेट कुलगुरूंशी संपर्क येत असे. याचा फायदा धवनकर यांनी घेतला. कुलगुरूंच्या कक्षात इतर विषयावर चर्चा सुरू असताना धवनकर जरा बाजूला होऊन तक्रारकर्त्या प्राध्यापकांपैकी एकाशी संपर्क साधायचे. तुमच्या तक्रारीवर चर्चा सुरू असून मी प्रकरण सांभाळण्याचा प्रयत्न करतोय हे पटवून द्यायचे. काही वेळा कक्षाच्या बाहेर बोलावून तक्रारीवर आत चर्चा सुरू आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पैशांची व्यवस्था करा, असे सांगून थेट कुलगुरूंच्या कक्षात निघून जायचे. या सगळ्या प्रकारामुळे कुलगुरूंच्या कक्षात चर्चा सुरू असल्याचे समजून प्राध्यापक घाबरत व धवनकरांच्या धमक्यांना बळी पडत, अशी माहिती आता समोर आली आहे.

हेही वाचा: ‘भारत जोडो’चे पडद्यामागील किस्से आणि व्यवस्थापन यंत्रणेचे अनुभव

कुलगुरू,धवनकरांकडून प्रतिसाद नाही

या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व डॉ. धर्मेश धवनकर या दोघांशीही संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr dharmesh dhawankar contact the vice chancellor office for extortion professors university of nagpur tmb 01
First published on: 29-11-2022 at 08:58 IST