अकोला : गणपती विसर्जन मिरवणूक व ‘ईद ए मिलाद’ निमित्त निघणाऱ्या मिरवणुकांच्या निमित्ताने अकोल्यात हिंदू – मुस्लीम एकात्मतेचा अनोखा संदेश देण्यात आला आहे. शहरात सौहार्द व सामाजिक एकोप्याला प्राधान्य देत गणेशोत्सवामुळे ‘ईद ए मिलाद’ची मिरवणूक पुढे काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मात्र, आता ईदनिमित्त ५ सप्टेंबरच्या सुट्टीचे काय? असा प्रश्न निर्माण झाला.

‘मरकज जमाते अहले सुन्नत बरार’ व ईद-मिलादुन्नबी मिरवणूक समितीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे आता ईदची मिरवणूक नियोजित असलेल्या ९ सप्टेंबरला सुट्टी देण्याची मागणी केली आहे. गणेशोत्सव सध्या मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून या दिवशी शहरातून गणपती विसर्जन मिरवणूक काढण्याची मोठी परंपरा आहे. मुस्लीम समाजाचा ‘ईद ए मिलाद’ ५ सप्टेंबर रोजी आहे. या सणानिमित्त मुस्लीम समाजाकडून देखील शहरातून मिरवणूक काढली जाते. दोन दिवसांत दोन मोठ्या मिरवणुका निघाल्यास प्रशासनावर प्रचंड ताण येऊ शकतो.

त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजाने आपली मिरवणूक पुढे ढकलून ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ताजनापेठ कच्छी मशिदीसमोरून पारंपरिक मार्गाने काढण्याचा निर्णय घेतला. सलग तिसऱ्या वर्षी मुस्लीम समाजाने हा निर्णय घेऊन एकतेचा आदर्श घालून दिला. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी ईद मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना त्यादिवशी सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

समन्वय समितीच्या बैठकीनंतर मिरवणूक समितीचे अध्यक्ष हाजी महमूद खान व कच्छी मशीदचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले. त्या निवेदनामध्ये, यापूर्वीही गेल्या दोन वर्षांमध्येही उत्सव एकत्र आल्यावर मुस्लीम समाजाने आपली मिरवणूक पुढे ढकलून दोन्ही समाजाच्या एकात्मतेला प्राधान्य दिले. यावर्षी देखील ती परंपरा कायम ठेवत हिंदू – मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला जात आहे. यापूर्वी तारीख पुढे ढकलली होती, त्यावेळी प्रशासनाने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. तीच परंपरा यंदाही कायम ठेऊन प्रशासनाने ९ सप्टेंबर रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली.

दोन्ही मिरवणुकांमध्ये पदाधिकाऱ्यांचा सत्कार

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये ताजनापेठ येथे मुस्लीम समाजाकडून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे, तर गांधी चौकात गणेशोत्सव मंडळाकडून ‘ईद ए मिलाद’च्या मिरवणूक समितीचा सत्कार करण्यात येईल.