नागपूर : कर्जबाजारी झालेल्या युवकाने कर्ज फेडण्यासाठी एका व्यापाऱ्याला खंडणी मागण्याचा कट रचला. कटात मित्राला सहभागी करुन घेतले. मित्राने फोन करून व्यापाऱ्याला तीन कोटींची खंडणी मागितली, असा खुलासा पोलीस तपासात झाला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खुशाल सदावर्ते (२८) रा. महाल आणि महेंद्र पराते (२७) रा. लालगंज असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. खुशालचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले तर महेंद्र आठवा वर्ग शिकलेला आहे. खुशालचे वडील मेनबत्ती विकायचे. आता खुशाल मेनबत्ती विकतो. गणेशपेठ येथील रहिवासी संतोष अग्रवाल (६२) हे मेणबत्तीचे मोठे व्यापारी आहेत. त्यांच्याकडून खुशाल मेनबत्ती खरेदी करायचा. त्याला अग्रवालच्या संपत्तीसह इतर कामाविषयीची माहिती होती. अलिकडे खुशालवर कर्ज झाले होते. त्याला कर्ज फेडायचे होते. मात्र, मेनबत्ती विक्रीतून कर्ज फेडने शक्य नव्हते. त्याला खंडणी वसूल करण्याची कल्पना सूचली. त्याने अग्रवालकडून खंडणी मागण्याची योजना आखली. परंतु अग्रवाल त्याला ओळखत असल्याने तो खंडणीसाठी फोन करू शकत नव्हता. त्याने मित्र महेंद्रला योजनेत सहभागी करून घेतले.

हेही वाचा – नागपूरकरांनो… घराबाहेर पडताना ‘हे’ रस्ते टाळा, वाहतूक कोंडीची शक्यता

हेही वाचा – वाढत्या अपघातांबद्दल चिंता, गडकरी म्हणाले, “नियम कडक केले, दंड वाढवला, कायदे कठोर केले; पण..”

ठरल्याप्रमाणे महेंद्रने २ जानेवारीला फोन करून अग्रवालला तीन कोटींची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि फोन बंद केला. परंतु अग्रवालने फार काही मनावर घेतले नाही. काही वेळानंतर पुन्हा फोन केला. अशा प्रकारे त्याने २ जानेवारीला पाच वेळा फोन करून खंडणी मागितली. सतत फोन आल्याने अग्रवाल भयभीत झाले. ३ जानेवारीला गणेशपेठ पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांना सारा प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. उपायुक्त गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात ऋषिकेश घाडगे आणि उपनिरीक्षक दिनेश माणूसमारे यांच्या पथकाने तीन दिवस सतत पाठपुरावा केला. तांत्रिक तपास करून दोघांनाही पकडले. रविवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extortion demanded by youths to pay off debts incidents in nagpur adk 83 ssb