अकोला : ‘आज रात्रीपासून नळ जोडणी खंडित होणार’ असे बनावट व खोटे संदेश शहरातील नागरिकांना समाज माध्यमांवर पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकारचे कुठलेही संदेश अधिकृतपणे पाठविण्यात येत नसल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले. नळधारकांना लुटण्याचा सायबर भामट्यांनी हा नवा डाव टाकला आहे.
या बनावट व खोट्या संदेशामुळे महापालिका प्रशासन त्रस्त झाले. या प्रकरणी पाणी पुरवठा विभागाने सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. शहरातील नळ धारकांनी सावध रहावे व वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर ऑनलाइन कराचा भरणा करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिकेचा पाणीपट्टी कर मोठ्या प्रमाणात थकीत आहे. त्यामुळे पाणीपट्टी कर वसुलीसाठी महापालिकेने मोहीम सुरू केली. त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली. पाणी पुरवठा विभागाकडून वसुलीवर जोर दिला जात आहे. त्याचाच फायदा करून घेण्यासाठी सायबर चोरट्यांनी नवीन शक्कल लढवली. शहरातील नळधारकांना समाज माध्यमातून महापालिकेचे नाव नमूद करून विशिष्ट आशयाचे संदेश पाठवले जात आहेत.
आज रात्रीपासून नळ जोडणी खंडित होणार असून हे टाळण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. या संदेशामध्ये एका व्यक्तीचे नाव व क्रमांक देखील दिला आहे. या संदर्भात महापालिकेकडे विचारणा केल्यावर हा संदेश बनावट व खोटा असल्याचे समोर आले. नळजोडणी धारकांनी अशा संदेशापासून सावध रहावे. महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचा संदेश पाठविण्यात आला नाही. नागरिकांनी अशा कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू नये व कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
या संदर्भात मनपा पाणी पुरवठा विभागाकडून सायबर सेल पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. सायबर भामट्यांच्या फसवणुकीच्या या नव्या युक्तीची चांगलीच चर्चा होत आहे. पाणीकराचा भरणा करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारची देयकासंदर्भात अडचण असल्यास महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात चौकशी करावी. वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर कराचा भरणा करू नये, असे आवाहन महापालिकेकडून केले.
खंडित विजेचा पाणी पुरवठ्याला फटका
शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या महान येथील धरणाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठ्याला त्याचा फटका बसला आहे. एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा होईल. शहरात दर चार दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे.