लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : खरीप हंगामाची तयारी ग्रामीण भागातील शेतकरी करू लागले आहे. त्यासाठी बियाणे, खतांची खरेदी लगबग बाजारातून दिसून येते. मिळेल ते बियाणे घेत पेरणीची तयारी सुरू असतांनाच आता बोगस बियाणे विक्री सूरू असल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे.

समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव येथे असा साठा दिसून आला. त्यावर शनिवारी रात्री कारवाई झाल्यानंतर एकास आज सकाळी अटक करण्यात आली आहे. गिरड पोलिसांनी मोहगाव येथील कैलास पांडुरंग नवघरे ३८, यास आज सकाळी विविध गुन्हे नोंदवून अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार समुद्रपूर येथील टाळयका कृषी कार्यालयास बोगस बियाणे विक्री होत असल्याची खबर गोपनीय सूत्राद्वारे मिळाली होती. कृषी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत पोलीस विभागास त्याची माहिती देत शनिवारी रात्रीच तडक मोहगाव गाठले. रात्री साडे अकरा वाजता आरोपी नवघरे याच्याकडे धाड टाकली. तेव्हा झडती घेण्यात आल्यावर एका हिरव्या रंगाच्या प्लास्टिक पाकिटावर सोमनाथ ६५९ पिकॉर्ड असे लिहलेले आढळून आले. मात्र ते अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले. प्लास्टिकच्या बॅग मध्ये कपाशी बियाण्याचे ९२ पाकिटे मिळाली. ज्यात ४५० ग्रॅम प्रती पाकीट असे ४१ किलो ४०० वजनाचे बियाणे होते. त्याची किंमत ७९ हजार ४८८ रुपये असल्याचे सांगितल्या जात आहे. पोलिसांनी हा माल जप्त केला.

आणखी वाचा-जगदंबा माता मंदिरात चोरी, चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद!

आरोपी नवघरे याच्याविरोधात फसवणूक तसेच बियाणे नियंत्रण आदेश, पर्यावरण संरक्षण अधिनियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियन व अन्य अंतर्गत १७ विविध कलमखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे दाखल करीत पंचनामा झाल्यावर आरोपी नवघरे यास पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सूरू झाला आहे. या प्रकरणात गिरड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील विविध पैलूने तपास करीत आहे.

आणखी वाचा-‘आरटीई’ची सोडत काढूनही माहिती राखून ठेवली, आता प्रतीक्षा १२ जूनची; कुणाला कुठली शाळा…

या घटनेने बियाणे बाजार तसेच ग्रामीण भागात चांगलीच खळबळ उडाली आहे. तालुका कृषी अधिकारी रामू प्रभुजी धनविजय यांनी ही तक्रार दाखल केल्यानंतर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. असा हा बोगस बियाण्यांचा माल किती प्रमाणात विकल्या गेला तसेच कोणत्या शेतकऱ्यांची आता पर्यंत फसवणूक करण्यात आली, याचाही तपास होणार असल्याचे म्हटल्या जाते. ऐन खरीप हंगामात हा प्रकार उघडकीस आल्याने कृषी विभाग धस्तावून गेल्याचे चित्र आहे. गतवर्षी सुद्धा वर्धेलगत एका गावात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे साठा आढळून आला होता. त्या ठिकाणी तर खास बोगस बियाणे तयार करण्याचा कारखानाच असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. आजच्या घटनेत केवळ बोगस बियाणे विक्री दिसून आली आहे. मात्र असे बोगस बियाणे तयार करणारा कारखाना तर जिल्ह्यात कुठे सूरू तर नाही ना, अशी शंका उपस्थित केल्या जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake seed stocks caught one arrested pmd 64 mrj