चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील वडसी गावातील करिष्मा अनिरुद्ध मेश्राम या शेतमजुराच्या मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. करिष्माची सहायक वनसंरक्षक या पदावर निवड झाली आहे. राज्यात अनुसूचित जाती महिलांमध्ये प्रथम क्रमांकाने ती पात्र ठरली. या उल्लेखनीय यशाबद्दल वडसी गावासह संपूर्ण चिमूर तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पूर्वी शेतमजूर असलेल्या अनिरुद्ध मेश्राम यांनी मुलांच्या शिक्षणासाठी मोलमजुरी सोबतच छोटासा व्यवसायही केला. त्यांच्या याच परिश्रमाचे मुलांनी चिज केले. मागील वर्षी मोठा मुलगा उमेश एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करीत पोलीस उपनिरीक्षक झाला. आता मुलीचीही सहाय्यक वनसंरक्षकपदी निवड झाली आहे.
करिष्माने प्राथमिक शिक्षण वडसी जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण गोंदेडा गुरुदेव माध्यमिक शाळेत आणि बी. एस्सी. शिक्षण ज्ञानेश महाविद्यालय, नवगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तिने पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी केली. करिष्माने एमपीएससी परीक्षेत राज्यात अनुसूचित जातीमधून प्रथम क्रमांक मिळवला.
