चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील शंकरपूर वन विभाग परिक्षेत्रातील आंबोली- आसोला गावालगत ईश्वर भरडे या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. नागरिक वन विभागावर चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर भरडे बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास शंकरपूर आंबोली मार्गावरील ठाणा रीट परिसरातील शेतात कापसाचे पीक पाहणी करण्यासाठी गेले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरी परतले नाहीत. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांची सायकल शेतात उभी आढळली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांचा मृतदेह आढळला.
काही दिवसापूर्वीच शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला केला होता. परंतु तिने आरडाओरड केल्यामुळे तिच्या जवळ असलेल्या तिच्या दीराने तत्परता दाखवत वाघाला हाकलून लावले. नशीब बलवत्तर म्हणून महिला बचावली. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा वाघाने एकाचा बळी घेतला.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी वन विभागावर रोष व्यक्त केला. चिमून परिक्षेत्रातील हा तिसरा वाघाचा बळी असून काही दिवसापूर्वी लावारी येथील एका महिलेचा वाघाने बळी घेतला होता. त्यानंतर शिवरा येथील माजी सरपंच असलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले. या परिसरात सध्या वाघाची दहशत निर्माण झाली असून परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
वाघाच्या हल्ल्यातील ३६ वा, तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील ३८ वा बळी
चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हा ३८ वा, तर वाघाच्या हल्ल्यातील ३६ वा बळी आहे. शंकरपूर परिसरात वाघाने दीड महिन्यात तिसरा बळी घेतला आहे. तिन्ही घटनांचे अंतर सुमारे २ किलोमीटर आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षात, तसेच मानव – वन्यप्राणी संघर्षात आणखी किती बळी जाणार? असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
