लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : पिझ्झा, नुडल्स आणि मंच्युरियन खाल्ल्यामुळे वडिलांनी मुलीवर आरडाओरड केली. वडिलांच्या बोलण्याचा राग आल्यामुळे एकुलत्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना प्रतापनगर हद्दीतील खामला येथे घडली. भूमिका विनोद धनवानी (१९, रा. प्लॉट नं. ४८२ , सिंधी कॉलनी, खामला) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे नाव आहे. विनोद धनवानी हे मोठे व्यावसायिक आहेत. त्यांना एकुलती मुलगी भूमिका ही बीबीए पदवीच्या प्रथम वर्षाला तर लहान मुलगा अकरावीला आहे.

मुलगी भूमिका हिला लहानपणापासून फास्टफूड आणि जंकफुड खाण्याची आवड होती. मात्र, वजन वाढण्याच्या भीतीमुळे तिची आई आणि वडिल तिला जंकफुड खाऊ देत नव्हते. मात्र, आईवडिलांच्या चोरून ती पिझ्झा, नुडल्स आणि मंच्युरियन खात होती. सोमवारी भूमिका ही सायंकाळी नुडल्स आणि मंच्युरियन खाऊन घरी परतली. तिच्या आईने कुठे गेली होती, अशी विचारणा केल्यानंतर तिने प्रामाणिकपणे सांगितले. नुडल्स आणि मंच्युरियन खाल्ल्याचे सांगताच तिच्या वडिलांचा पारा चढला. त्यांनी भूमिकाला चांगलेच खडसावले.

आणखी वाचा- शीतपेयात गुंगीचे औषधी टाकून शिक्षिकेवर बलात्कार, फेसबुकवरुन मैत्री करणे भोवली

यानंतर हातठेल्यावरील काहीही न खाण्याची तंबी दिली. भूमिकाने वडिलांची माफी मागून वेळ मारून नेली. मात्र, वडिलांनी रागावल्याचा तिला रात्रभर पश्चाताप होत होता. अपमानीत झाल्यासारखे वाटत असल्याने तिने घरात ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सात वाजले तरी भूमिका झोपेतून न उठल्याने तिच्या आईने दार ठोठावले. आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आईने वडिलांना आवाज दिला आणि दोघांनी दरवाजा तोडला. भूमिका गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father got angry because of eating junk food girl committed suicide adk 83 mrj