नागपूर : भांडेवाडी परिसरातल्या कचरा प्रक्षेपण क्षेत्रात घंटा गाडीवर चालक असलेल्या एकाचा कचरा वेचणाऱ्या दुसऱ्या एकाने क्षुल्लक कारणावरून पाठीमागून वार करत खून केल्याची धक्कादायक घटना वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत रविवारी घडली. अभिषेक राजकुमार पिंपळीकर (२५, सूरजनगर, वाठोडा) असे मृतकाचे नाव आहे.
अभिषेकचे वडील राजकुमार यांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. रविवारी त्यांचे श्राद्ध असल्याने अभिषेक घरीच होता. भांडेवाडी कचरा प्रक्षेपण क्षेत्रातल्या घंटा गाडीवर चालक असलेला अभिषेक याचा वस्तीत राहणारा प्रकाश गायकवाड याच्याशी काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता. प्रकाश हा देखील भांडेवाडीत कचरा वेचण्याचे काम करतो.
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने अभिषेकची आई मीना या स्वयंपाकाचे काम करतात. वडिलांच्या श्राद्धाची पुजा केल्यानंतर अभिषेक सायंकाळी सहा वाजता काही वेळासाठी बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून निघाला. दरम्यान प्रकाश गायकवाडचा रात्री त्याच्याशी वाद झाला. यात प्रकाशने पाठीवर चाकूने वार केल्यानंतर रक्तबंबाळ अभिषेक अवघ्या २०० मिटर अंतरावरील घराकडे धावत निघाला. पण तो घरी पोहचू शकला नाही.
रात्री पावणे दहाच्या सुमारास शेजारील मुलगा आरडाओरड करत आला व मीना यांना अभिषेक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. मीना यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना अभिषेक रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्यांनी विचारणा केली असता प्रकाशने जुन्या वादातून मारल्याचे सांगितले. मीना यांचा आक्रोश ऐकून वस्तीतील इतर लोक जमा झाले.
अभिषेकच्या मित्रांनी त्याला मेडिकलमध्ये नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मीना यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकाश गायकवाडला अटक केली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशीच मुलाचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे अभिषेकची आई मिना यांना मोठा धक्का बसला आहे.