एकीकडे देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना अमरावतीतील लक्ष्मी नगर परिसरात एका आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या अकोला पोलिसांच्या पथकावर आरोपीने गोळीबार केला, यात सुदैवाने पोलीस बचावले.राजेश रावत असे आरोपीचे नाव आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी अकोला पोलिसांचे पथक गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी नगर भागात पोहोचले होते. आरोपीला ताब्यात घेण्याआधीच त्याने पोलीस पथकावर गोळीबार केला. त्याने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. सुदैवाने यात पोलीस कर्मचारी बचावले. एकीकडे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना शहरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या तावडीतून स्वतःला वाचवण्यासाठी आरोपीने गोळीबारानंतर भरधाव वेगात वाहन चालवित पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे वाहन एका खांबावर धडकले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात केली आहे.

काही दिवसांपूर्वीच दोन गटातील वादातून एका व्यक्तीने बाबा चौक परिसरात गोळीबार केला होता. त्यात एक १३ वर्षीय विद्यार्थिनी जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता चक्क पोलिसांवर गोळीबार झाल्यामुळे अमरावतीतील गुन्हेगारांची हिंमत वाढल्याचे अधोरेखित होत आहे. या गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी पोलीस काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing on akola police in amravati amy
First published on: 15-08-2022 at 14:17 IST