बुलढाणा : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान बूट भिरकवण्याचा प्रयत्न वकील राकेश तिवारी यांनी केला. त्यांना सुरक्षा रक्षकांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. पंतप्रधानांपासून अनेक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. असा प्रकार याआधी घडला नव्हता. एका ज्येष्ठ वकिलाने असे कृत्य करणे हे योग्य नसल्याचा सूर उमटला.
या प्रकरणामुळे देशात वादळ उठले असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी धक्कादायक विधान केले आहे. या माथेफिरू वकिलास गोळी मारण्यास तयार असल्याचे वक्तव्य करून वाद ओढावून घेतलाच, पण या वादाचा नव्याने भडका उडवून दिला आहे. यावरून उठलेले शाब्दिक वादळ माजी मंत्र्यांच्या या विधानामुळे काही काळ शमणार नाही, अशी शक्यता आहे.
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने बूट भिरकवण्याचा प्रयत्न केला. देशाच्या इतिहासात इतकी गंभीर घटना घडूनही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बघ्याची भूमिका घेत असतील आणि त्याला कुठलीही शिक्षा होत नसेल तर मलाही वाटते, हातात पिस्तूल घ्यावे आणि त्या माथेफिरू वकिलावर गोळ्या झाडाव्या, असे धक्कादायक विधान मेहकरचे माजी आमदार आणि माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले आहे. त्याचवेळी वकिलावर गोळ्या झाडल्यावर माझ्यावर कोणतीही कारवाई करू नये, मला कुठलीही शिक्षा करण्यात येऊ नये, अशी अजब मागणीही त्यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता वाद आणखी उफाळून येण्याची दाट शक्यता आहे.
वकील राकेश तिवारी यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट भिरकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना या कृतीचा कुठलाही पश्चाताप नसल्याचे समोर आले आहे. एका दैवीशक्तीने आपल्याकडून हे कृत्य करवून घेतल्याचा कांगावा या महाशयांनी केला. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जिर्णोद्धार करण्याच्या मागणीच्या याचिकेदरम्यान सरन्यायाधीश गवई यांनी टिप्पणी केली होती. त्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा रमेश किशोर तिवारी यांनी केला. त्यातून आपण हे कृत्य केल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र आता माजी मंत्री सुबोध सावजी यांनी या वादात उडी घेऊन आणि वादळी विधान करून एकप्रकारे या वादात तेल ओतण्याचे काम केल्याचे मत व्यक्त होत आहे. याचे पडसाद राज्यातच नव्हे तर देशात उमटण्याची दाट शक्यता आहे.