नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूर लवकरच भारताच्या संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रात ऐतिहासिक स्थान मिळवण्याच्या मार्गावर आहे. फ्रान्सच्या दसॉल्त एव्हिएशन या विमाननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीची भारतात पूर्णपणे ‘राफेल’ लढाऊ विमाने तयार करण्याची योजना आहे. नागपूर येथील मिहान (मल्टिमोडल इंटरनॅशनल कार्गो हब अ‍ॅण्ड एअरपोर्ट) येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे.

सध्या मिहान-सेझ मध्ये दसॉल्त रिलायन्स एअरोस्पेस लि.चे उत्पादन केंद्र आहे, जेथे राफेलच्या पंखांपासून ते फ्युझेलाजपर्यंतचे महत्त्वाचे भाग तयार केले जातात. नवीन प्रस्तावानुसार, हे केंद्र पूर्णपणे राफेलच्या उत्पादन व असेंब्लीसाठी सक्षम बनवले जाणार आहे, ज्यातून दरमहा दोन विमाने तयार होतील. जर ही योजना मंजूर झाली, तर फ्रान्सबाहेर पूर्णपणे राफेल तयार करणारे नागपूर हे पहिले शहर ठरेल.

भारतीय हवाई दलास सध्या केवळ ३१ लढाऊ स्क्वॉड्रन्स उपलब्ध आहेत, जे अधिकृत मान्यतेप्रमाणे ४२ असावेत. त्यामुळे नागपूरमधून राफेलची जलद डिलिव्हरी ही गरज भागवण्यास मोठी मदत ठरेल. तसेच, ११४ मल्टी-रोल फायटर खरेदीसाठी सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेलाही गती मिळेल.

या प्रकल्पाचा स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर मोठा परिणाम होणार आहे. हजारो अभियंते, तंत्रज्ञ व औद्योगिक कुशल कामगारांना रोजगार मिळेल. अचूक पार्ट तयार करणाऱ्या कंपन्यांपासून ते उच्च-तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांपर्यंत, संपूर्ण एअरोस्पेस इकोसिस्टीम नागपूरमध्ये उभी राहील.

हैदराबाद येथील टाटा ॲडवान्सड सिस्टम लि. व सॅफ्रान हे कंपन्या सुद्धा या प्रकल्पात सहभागी असतील, मात्र नागपूर हे दसॉल्त च्या भारतातील धोरणाचे केंद्र असेल. ६० टक्के स्थानिक उत्पादनाचे लक्ष्य असल्यामुळे, उत्पादन खर्चात ३० टक्के पर्यंत घट होणार आहे आणि भारताचे संरक्षण निर्यातक्षेत्र मजबूत होईल.

नागपूरमध्ये तयार होणारे राफेल विमाने अत्याधुनिक एफ४ मानकाचे असतील, ज्यामध्ये सुधारित रडार प्रणाली, ड्रोनसोबत समन्वय आणि भविष्यातील इंजिन अपग्रेड्स जीटीआरईच्या सहकार्याने केले जातील.

या योजनेला संरक्षण खरेदी मंडळाची मंजुरी मिळाल्यास, पुढील तीन वर्षांत उत्पादन सुरू होईल आणि सहा वर्षांत सर्व ११४ विमाने तयार होतील. हे दसॉल्तच्या फ्रेंच युनिट्सपेक्षा अधिक जलद गतीने होईल, असे सांगण्यात येत आहे.

दोन आघाड्यांवरील धोके, राफेलची तातडीची गरज

सध्या भारतीय हवाई दलाकडे केवळ ३१ सक्रिय फायटर स्क्वॉड्रन्स आहेत, जे की मंजूर असलेल्या ४२ स्क्वॉड्रन्सच्या तुलनेत खूपच अपुरे आहेत. या पार्श्वभूमीवर देशाला चीन आणि पाकिस्तान या दोन आघाड्यांवर  एकाच वेळी लढायचे आहे. त्यामुळे हवाई दलासाठी तातडीने बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे.