अमरावती : ‘डिजिटल अरेस्ट’ या सायबर फसवणुकीबाबत जनजागृती केली जात असली तरी अजूनही उच्चशिक्षित या फसवणुकीला बळी पडत आहेत.

अमरावती शहरातील एका महिलेची सायबर भामट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल १७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तुमच्या सीमकार्डवरून अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारीत होत आहेत. मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सागून तोतया पोलिसांनी या महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ केले आणि अवघ्या सात दिवसांत १७ लाख रुपये उकळले.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादी महिलेला सात दिवसांपुर्वी एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलीस अधिकारी असल्याची ओळख दिली. नंतर त्या तोतया अधिकाऱ्याने जे सांगितले, ते ऐकून महिलेच्या पायाखालची वाळू सरकली.

तुमच्या आधारकार्डाचा गैरवापर करून एक सीमकार्ड घेण्यात आले आहे. हे सीमकार्ड असलेल्या मोबाईलमधून अश्लील संदेश, छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठविण्यात आले आहेत. हे सर्वत्र प्रसारीत होत आहेत. त्यामुळे तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तुम्हाला पकडण्यासाठी पोलीस तुमच्या घरी येत आहेत, असे या तोतयाने सांगितले.

फोन करणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. त्याने बनावट कागदपत्रे दाखवली. त्यामुळे फिर्यादी महिला घाबरल्या. त्यांना बराच वेळ मानसिक त्रास देण्यात आला. या प्रकरणातून स्वत:ला वाचवायचे असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून आपण सहकार्य करू शकतो, असे या तोतयाने महिलेला सांगितले. फिर्यादी महिलेचा त्यावर विश्वास बसला आणि त्या भामट्यांच्या जाळ्यात अडकल्या.

या प्रकरणी कारवाई टाळण्यासाठी १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत तब्बल १७ लाख २० हजार २३० रुपये उकळण्यात आले. ही रक्कम त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पाठवली. पुढे त्यांना संशय आला आणि आपली फसवणूक होत असल्याचे समजले. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘डिजिटल अरेस्ट’ हा सायबर फसवणुकीचा नवा प्रकार आहे. यात सायबर भामटे स्वत:ला पोलीस अधिकारी, सीबीआय किंवा अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत सावज हेरतात.