कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या तरणेबांड पहेलवानांना जंगलाच्या राजाचे दर्शन झाले. निमित्त होते ताडोबा अंधारी व्याघ्र संरक्षण प्रकल्पात मोफत टाइगर सफारीचे. राज्यभरातून आलेल्या पहेलवानांना राज्याचे वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मोफत सफारी घडवून आणली.
राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, मुल येथे दि. ८ ते १० एप्रिल या कालावधीत करण्यात आले. ८ एप्रिल रोजी सदर कुस्ती स्पर्धेचे उदघाटन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत राज्याच्या विविध भागातुन खेळाडु सहभागी झाले होते. या सर्व खेळाडुंना व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांना जगप्रसिद्ध ताडोबा प्रकल्प बघण्याची संधी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९ एप्रिल रोजी प्रामुख्याने सकाळच्या सत्रात १३२ खेळाडू व पालक तर दुसऱ्या दिवशी १० एप्रिलला सकाळच्या सत्रात ५९ खेळाडू व पालकांनी ताडोबा येथे टायगर सफारीचा आनंद लुटला. या सफारी दरम्यान खेळाडू व पालकांनी टायगर फायटिंग सुद्धा अनुभवली. टायगर सफारी दरम्यान उपस्थित सर्व खेळाडू, पालक व व्यवस्थापकांनी कुस्ती स्पर्धेची संपूर्ण तयारी त्याचबरोबर विनामुल्य टायगर सफारीचा आनंद याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. या संपूर्ण नियोजनात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी जबाबदारी सांभाळली. यासाठी विशेष करुन पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, स्वीय सहाय्यक संतोष अतकरे, वनाधिकारी काळे तसेच सोयाम यांनी खेळाडु व त्यांच्या पालकांच्या ताडोबा सफारीचे नियोजन केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free tadoba safari for wrestlers on the initiative of guardian minister sudhir mungantiwar rsj 74 amy