नागपूर : उपराजधानीत ‘जी-२०’ ची बैठक तोंडावर असल्यामुळे शहरातील कृत्रिम सौंदर्य दाखवण्यासाठी मंत्रालय आणि जिल्हा प्रशासनाच्या दबावाखाली अनेक आक्रमक निर्णय घेण्यात येत आहेत. नुकताच पोलीस आयुक्तांनी शहरातील भिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश जारी करीत अनेकांच्या पोटावर लाथ मारण्याचा निर्णय घेतला आहे. तर, यापूर्वीसुद्धा शहरातील तृतीयपंथीयांवर खंडणीचे गुन्हे दाखल करून रस्त्यावर पैसे मागण्यास मज्जाव केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २० ते २१ मार्चदरम्यान उपराजधानीत ‘जी-२०’ ची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे शहराचे सुशोभिकरणाचा सपाटा लागला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने शहरात होणाऱ्या ‘जी-२०’ च्या बैठकीसाठी नियोजन करणे सुरू केले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज कलम १४४ नुसार अधिसूचना जारी करीत रस्त्यावर भीक मागणाऱ्यांवर बंदी घालत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या मतानुसार, भिकारी म्हणून असलेले लोक एकट्याने किंवा गटाने रस्त्यावर, फुटपाथवर आणि चौकात उभे राहून आक्षेपार्ह हावभाव करून वाहनचालकांना पैसे मागतात. पैशांसाठी त्रस्त करीत पैसे देण्यासाठी भाग पाडतात. हे कृत्य कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा ठरते. भिकारी हे पदपथावर ताबा मिळवून रहदारीस अडथळा निर्माण करतात. मात्र, त्या लोकांविरुद्ध कुणी तक्रार देण्यास धजावत नाहीत, त्यामुळे पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत ९ मार्च ते ३० मार्च या कालावधीत भिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश पारीत केला आहे.

हेही वाचा – निवृत्त अधिकारी पॉश हॉटेलात, विदर्भातील ‘आरटीओ’ची बाहेर रांग, नेमकी कशाची मोर्चेबांधणी?

गुन्हा दाखल, पुढे काय?

भिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागपूर पोलीस दलात भिकारी विरोधी पथक आहे. मात्र, भिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर पुढे काय करायचे? त्यांना अटक केल्यास त्यांना कुठे ठेवावे? त्यांच्या उदर्निवाहसाठी जिल्हा प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाने काही तरतूद केली आहे का? फक्त ‘जी-२०’ च्या बैठकीसाठीच ही उठाठेव करीत आहे, असे प्रश्न पोलीस आयुक्तांच्या आदेशाने समोर आले आहेत.

हेही वाचा – नागपूर : पुरुष मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानातून महिलेला जीवदान

आक्षेप असल्यास सूचवा

भिकाऱ्यांवर बंदी घालून गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाबाबत शहरातील कुणालाही आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस आयुक्तांच्या ‘ई-मेल’वर किंवा पोलीस भवन, आयुक्तालयात लेखी सूचना कळवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. संयुक्तिक आणि योग्य वाटणाऱ्या सूचना-आक्षेपांची दखल घेण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G20 meetings in nagpur is near and order to register cases against beggars adk 83 ssb