गडचिरोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून स्वतःहून गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात सेवेची संधी मागितल्याने चर्चेत आलेले गटविकास अधिकारी अभिजित पाखरे यांनी युपीएससीतही यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, पाखरे यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात प्राप्त केले असून ही बातमी मिळाली तेव्हा ते अहेरीत निवडणूक कर्तव्य बजावत होते. अभिजित गहिनीनाथ पाखरे हे मूळचे शिरुर कासार तालुक्यातील पाडळी (जि. बीड) येथील आहेत. त्यांचे आई- वडील शिक्षक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

त्यामुळे घरात शिक्षणाचे वातावरण होते. खासगी शाळेत शिक्षक असलेले वडील ग्रामपंचायतीचे सरपंचही आहेत. २०१९ मध्ये त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी या पदासाठी त्यांची निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर नाशिकच्या येवला येथे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांची पहिली नियमित नियुक्ती होणार होती. आदिवासीबहुल, मागास व अतिदुर्गम भागातून प्रशासकीय सेवेची सुरवात करण्याच्या हेतूने त्यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहून गडचिरोलीत पोस्टिंग द्या, अशी विनंती केली होती. त्यानुसार त्यांना गडचिरोलीच्या अहेरी या अत्यंत संवेदनशील ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून नेमण्यात आले. १३ मार्च २०२४ पासून ते अहेरीत कर्तव्य बजावत होते. दरम्यान, त्यांनी २०२३ मध्ये युपीएससी २०२३ ची नागरी सेवा परीक्षाही दिली होती. यात ७२० व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा : “नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा

अभिजित पाखरे यांनी गावातील जि.प. शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बीडच्या चंपावती विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी पदवी संपादन केल्यावर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. आधी एमपीएससी व नंतर युपीएससी क्रॅक करत यशाचा झेंडा फडकावला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli bdo abhijeet pakhre clears upsc exam with 720 th rank ssp 89 css