गडचिरोली : चार दशके नक्षलवादाच्या हिंसेने होरपळणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी एक ऐतिहासिक सुवर्णपान लिहिले गेले. नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता, सेंट्रल कमिटी आणि पॉलिट ब्युरोचा सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती याने आपल्या ६१ जहाल सहकाऱ्यांसह राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या अभूतपूर्व घटनेने केवळ गडचिरोलीतीलच नव्हे, तर देशातील नक्षल चळवळीचा कणाच मोडला आहे. या ऐतिहासिक यशाचे शिल्पकार ठरले आहेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, ज्यांनी गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी रणनीती आखून नक्षलवादाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात चारीमुंड्या चीत केले आहे.गेल्या तीन वर्षांच्या आपल्या कार्यकाळात पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नक्षलविरोधी अभियानाला त्रिसूत्री कार्यक्रमाची जोड दिली.

 एकीकडे ‘सी-६०’ कमांडोंच्या माध्यमातून धडक कारवाया करून नक्षलवाद्यांचे धाबे दणाणून सोडले, तर दुसरीकडे शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा प्रभावी वापर करत भरकटलेल्या तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी विश्वासाचे वातावरण निर्माण केले. तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या स्तरावर, ‘दादालोरा खिडकी’ सारख्या अभिनव उपक्रमांतून पोलीस आणि दुर्गम भागातील जनता यांच्यातील दरी कमी करून नक्षलवाद्यांचा जनाधारच संपुष्टात आणला.

निलोत्पल यांच्याच कार्यकाळात पोलिसांनी ४३ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले, ९० नक्षलवाद्यांना अटक केली आणि आता भूपतीच्या आत्मसमर्पणासह एकूण १२६ नक्षलवाद्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. त्यांच्या अचूक नियोजनामुळेच उत्तर गडचिरोलीचा भाग पूर्णपणे नक्षलमुक्त करण्यात यश आले. दंडकारण्य विभागाचा प्रमुख कमांडर गिरीधर आणि जहाल महिला नक्षल नेता तारक्का यांचे आत्मसमर्पण हे देखील त्यांच्याच रणनीतीचे फलित होते. विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात शरण आलेल्या भूपतीची पत्नी तारक्का हिने निर्माण केलेल्या विश्वासामुळेच भूपतीच्या आत्मसमर्पणाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

ऐतिहासिक आत्मसमर्पण सोहळा

गडचिरोली पोलीस मुख्यालयात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते. त्यांनी शरण आलेल्या भूपती आणि इतर नक्षलवाद्यांना भारतीय संविधानाची प्रत देऊन त्यांचे मुख्य प्रवाहात स्वागत केले. “हा क्षण म्हणजे गडचिरोलीतील नक्षलवादाच्या अंताच्या अध्यायाची सुरुवात आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. त्यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि त्यांच्या टीमच्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रमांना दिले.

यशस्वी रणनीती

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केवळ ‘बंदुकीला बंदुकीने’ उत्तर न देता, एक मानवी दृष्टिकोन ठेवला. त्यांनी पुनर्वसन योजनेला प्राधान्य दिले, शरण आलेल्यांना रोजगार आणि सन्मानाचे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. ‘दादालोरा खिडकी’ (तुमची हक्काची खिडकी) या उपक्रमातून त्यांनी प्रशासकीय योजना थेट दुर्गम गावांपर्यंत पोहोचवल्या, ज्यामुळे स्थानिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला आणि नक्षलवाद्यांना मिळणारी सहानुभूती आणि रसद पूर्णपणे तोडली गेली. सीमेवरील संवेदनशील भागांमध्ये नवीन पोलीस स्टेशन उभारून त्यांनी नक्षलवाद्यांच्या हालचालींवर गरुडाची नजर ठेवली. आज गडचिरोलीत नक्षलवादी केवळ नावापुरते शिल्लक आहेत. कधीकाळी ‘शिक्षेची पोस्टिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात आता शांतता आणि विकासाचे वारे वाहत आहेत. भूपतीसारख्या सर्वोच्च नेत्याचे आत्मसमर्पण हे केवळ एका व्यक्तीचे किंवा गटाचे शरण येणे नसून, हिंसेच्या विचारधारेचा झालेला निर्णायक पराभव आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या कुशल आणि धाडसी नेतृत्वाने गडचिरोलीच्या इतिहासाला एक नवी, सकारात्मक दिशा दिली आहे, ज्यामुळे ते जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पोलीस अधीक्षक ठरले आहे.