नागपूर : शहरातील गजबजलेला नवीन सुभेदार लेआऊट चौकात गजानन विद्यालय असून तेथे होणाऱ्या गर्दीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना अपघात होण्याचा धोका संभवतो. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी होणाऱ्या गर्दीमुळे येथे दररोज वाहतूक विस्कळीत होते. यावर शाळा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांना अद्यापपर्यंत कोणताही तोडगा काढता आला नाही, हे विशेष.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण नागपुरातील उदयनगर ते चक्रधरनगर मार्गावर नवीन सुभेदार लेआऊट चौकात गजाजन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्याल आहे. त्यात साधारणपणे हजारांवर विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेतात. रस्त्याला लागूनच या विद्यालयाचे एकमेव प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार अरुंद असल्याने मुलांना सायकली आत नेतांना अडचणी येतात. अनेकदा सायकली अडकून पडतात. चौकातून शहराच्या चारही बाजूने रस्ते जात असल्याने त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो.

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन

पाचवी ते बारावीपर्यंत असलेली ही शाळा सकाळी ७.३० आणि दुपारी १२ वाजता अशी दोन पाळ्यांमध्ये भरते. त्यामुळे दुपारी बारा वाजता चौकात विद्यार्थ्यांच्या सायकली, ऑटो आणि स्कूलव्हॅनमुळे मोठी कोंडी होते. अनेकदा विद्यार्थी या कोंडीत सापडतात. त्यामुळे त्यांना शाळेत जाण्यास विलंब होतो, अशी अनेक पालकांची तक्रार आहे. शाळेला लागून शांतता झोनचा फलक लागला आहे. दिवसा ५० ते रात्री ४० डेसिबल अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे. मात्र, चौकात वाहनांचा आवाज आणि हॉर्नचा आवाज बघता ध्वनीमर्यादेचे रोज उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येते. शाळेच्या बाजुला ‘नो हॉर्न’ अशी फलक लावलेली आहेत. मात्र, त्याचा काहीही उपयोग होत नाही. वाहने आणि नागरिकांच्या गर्दीच्या आवाजामुळे शिक्षकांसह विद्यार्थी त्रस्त आहेत. दिवसभर या चौकातून जाणाऱ्या वाहनांचा आवाजाचा शिक्षणावरही परिणाम पडत आहे.

सायकलींनी व्यापले मैदान

तीन मजली असलेल्या शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांच्या सायकली ठेवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळायला मैदान नाही. खेळण्यासाठी मुले चक्क चौकातून समोरील मोकळ्या जागेत जातात. चौकातील वाहनांच्या वर्दळीत एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शाळेला ऑटोचालकांचा वेढा

चौकालगत शाळा असल्यामुळे शाळेच्या भींतीला लागून प्रवाशी वाहतूक करणारे ऑटो थांबतात. तेथूनच प्रवाशी भरल्या जातात. तसेच हातठेल्यांनी बरीच जागा व्यापली आहे. प्रवेशद्वारासमोरच प्रवाशांची वाट बघत ऑटो उभे राहत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

“वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. चौकात वाहतुकीची कोंडी झाल्यास लगेच मदत करायला हवी. विद्यार्थ्यांच्या शाळा सुटण्याच्या वेळात शाळेजवळ उपस्थित रहावे. ” विनोद लुटे (वस्तीतील नागरिक)

सुभेदार लेआऊट चौक गजबजलेला असल्यामुळे वाहनांची बरीच वर्दळ असते. उदयनगर ते चक्रधरनगर या मार्गावर नेहमीसाठी वाहतूक पोलिसांची गस्त असते. वाहतूक कोंडी झाल्यास लगेच पोलीस वाहतूक सुरळीत करतात. भरत कऱ्हाडे, पोलीस निरीक्षक, सक्करदरा वाहतूक शाखा. नागपूर</p>

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajanan vidyalaya located in busy nabi subhedar layout chowk poses accident risk to students adk 83 sud 02