गोंदिया: गोंंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बुधवारी १४ ऑगस्टला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी समितीचे विशेष निमंत्रित सदस्य माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना बोलण्यास मनाई केल्याने या भरगच्च सभेचे वातावरण काही काळाकरीता तणावपूर्ण झाले होते. नियोजन समिती अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्याच्या या भूमिकेचा निषेध नोंदवत गोपालदास अग्रवाल यांनी सभात्याग केला. विशेष म्हणजे नियोजन समितीच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार विनोद अग्रवाल, परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, आमदार सहैसराम कोरेटी, आमदार मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीची ही खेळी तर नसावी ना अशा राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सदस्याला प्रश्न उपस्थित करण्यापासून रोखण्याची गोंदिया जिल्ह्यातील इतिहासातील ही पहिलीच घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या अध्यक्षांच्या काळात घडली. हेही वाचा - प्रफुल्ल पटेलांना पराभूत करणारे भाजपचे माजी खासदार उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार ? माजी आमदार अग्रवाल यांनी आपले काही प्रश्न उपस्थित करुन प्रश्नाचे समाधान करण्याची विनंती केली, मात्र पालकमंत्री आत्राम यांनी समाधान करण्याएवजी त्यांना बोलण्यासच मनाई केली. त्यामुळे संतप्त गोपालदास अग्रवाल यांनी पालकमंत्रीच सदस्यांचे प्रश्न थांबवत असतील तर समस्यांचे समाधान कसे होणार असे म्हणत सभात्याग करीत बाहेर निघाले. नियोजन समितीची सभा संपल्यानंतर या संदर्भात विचारले असता आमदार परिणय फूके यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळत आजची ही नियोजन समितीची सभा फार उत्साहवर्धक झाली असल्याचे व या सभेत बरेच प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आणि भविष्यातील जिल्ह्यातील गंभीर प्रश्नावर देखील सकारात्मक चर्चा या सभेत झाली असल्याचे सांगितले. हेही वाचा - नागपूर : आता ‘हे’ डॉक्टरही संपात! रुग्णांचा जीव टांगणीला… नियोजन समिती सभेचं एक नियम असते, प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक सदस्याला आहे पण ते सभेच्या नियमानुसार असायला हवा. नियमानुसार विरुद्ध असले तर ते खपवून घेतले जात नाही, माजी आमदार अग्रवाल यांची प्रश्न विचारण्याची पद्धत अरेरावीकारक असल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्यास मनाई केली. ते या नियोजन समितीच्या सभेतून निघून गेले असल्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम सभेनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.