गोंदिया: अर्जुनी मोरगाव तालुका हा गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक तालुका आहे. शेती बरोबरच दुग्ध व्यवसाय व पशुपालन हा जोडधंदा म्हणून येथील शेतकरी व रहिवासी बऱ्याच प्रमाणात करतात. परतीच्या पावसाने येथील धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्याबरोबरच आता बिबट्याचा वावर वाढला. बिबट्याचा बंदोबस्त करावा. पिंजरे लावून यांना जेरबंद करा, अशी मागणी होत आहे . वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध जवळील ग्राम सावरटोला, बोरटोला, भिवखिडकी, सुकळी, खैरी, सुरगांव, चापटी, देवलगाव रामनगर, संजय नगर, कडोली, गोठणगाव, प्रतापगड, दिनकरनगर या परिसरात एक नव्हे तर तीन-तीन बिबट्याचा वावर आहे. बिबट्या या गावात शिरून अनेक बोकड, शेळ्या, कोंबड्या, फस्त करत आहे. संजयनगर नंतर या परिसरात व तालुक्यात कुठेही मानवी हल्ले बिबट्याने केले नाही. संजय नगर, धमदीटोला येथे एक बालक व एक महिलेचा बळी सप्टेंबर महिन्यात बिबट्याने घेतला होता. त्यानंतरचा जन आक्रोश वन विभागाने अनुभवला. परंतु बिबट मानवी वस्ती पादाक्रांत करतील अशी भीती रहिवाशांना आहे. शेतातील कामे सायंकाळ होण्या पूर्वीच हातातील काम अर्धवट सोडून शेतकऱ्यांना घरी परत यावे लागते. दिवसभर शेतात जीव मुठीत धरून काम करावे लागते.
नवेगावबांध जवळील सुरगाव सारख्या गावात बिबट येणे नित्याचे झाले आहे. गेल्या दोन महिन्यापासून या गावात बिबट्याच्या भीतीने लहान मुलांना “बेटा जल्दी सो जाओ नहीं तो बिबट आ जायेगा’, असे घरच्या मुलांना सांगावे लागते. सातत्याने बिबट येतो, त्या गावात व्हिडिओ कॅमेरे लावण्यापलीकडे वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबत वन विभागाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत ? तेच कळायला मार्ग नाही. या प्रश्नांवर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बोलायला, प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत. याकडे लोकप्रतिनिधीचेही लक्ष नाही. शेतकरी, पशुपालक यांच्या विषयों अधिकारी, लोकप्रतिनिधी गंभीर नसून, संवेदनशीलतेने बघतच नाही, अशा तक्रारी लोकांच्या आहेत.
जागृती व प्रशिक्षण
वनविभागाने बिबट ,वाघाच्या सवयी विषयी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन जागृती करावी. बिबट्या दिसल्यास घाबरू नये, योग्य अंतर राखावे व तातडीने अधिकाऱ्यांना कळवावे, शेतात एकट्या दुकट्याने जाऊ नये समूहाने जावे. मोबाईलवर गाणे वाजवत जावे. बिबट्या बहुधा लहान उंचीच्या व्यक्ती किंवा बसलेल्या माणसावर हल्ला करतो. त्यामुळे गवत कापणाऱ्या महिला, लहान मुले, अथवा अंधारात शेतावर जाणारे व्यक्ती जास्त धोक्यात असतात. अनेकदा बिबट्या कुत्र्याच्या शोधात घराजवळ येतो, कारण कुत्रा हे त्याचे आवडते भक्ष्य असते.
शेतात प्रकाश व्यवस्था करावी
बिबट्याचा संचार प्रामुख्याने सूर्यास्तापूर्वी अर्धा तास ते सूर्यास्तानंतर अर्धा तास, तसेच सूर्योदयानंतर अर्धा तास ते सूर्योदयापूर्वी अर्धा तास या काळात सर्वाधिक असतो. टॉर्चचा वापर, मोबाईल प्रकाश, लाकडी काठी वा हुक सोबत ठेवावा. शक्य असल्यास शेतात सौरदिवे किंवा मोशन सेन्सर दिवे बसवावेत, ज्यामुळे बिबट्याचा संचार लवकर लक्षात येतो. तसेच, जर परिसरात बिबट्याचे पाऊलखुणा, माती खोदलेली जागा प्राण्यांचे अवशेष आढळले, तर त्वरित वनविभागाला माहिती द्यावी.
वन विभाग काय म्हणतो
बिबट्याचा वावर असलेल्या गावात जनजागृती सुरू आहे. वन विभागाचे गस्तीपथक गावात रात्रीला गस्ती करत आहेत. बिबट्याच्या हालचाली दिसून आल्यास, नागरिकांनी वन विभागाशी संपर्क करावा. तातडीच्या उपाययोजना केल्या जातील, असे साहाय्यक वनसंरक्षक, (प्रादेशिक वन विभाग नवेगावबांध) अविनाश मेश्राम म्हणाले.
संजय नगरची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. वनक्षेत्र गोठणगाव अंतर्गत रामनगर, संजयनगर, दिनकरनगर तसेच गोठणगाव मध्ये दररोज गस्त चालू आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी संजय नगर, कढोली, गोठणगाव, परिसरात पिंजरे लावण्यात आले आहेत. दिवसा व रात्री गस्तीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. – मिलिंद पवार, वनपरिक्षेत्राधिकारी, प्रादेशिक वन क्षेत्र गोठणगाव
