गडचिरोली : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांची निवड उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर त्यांना स्वीकृत सदस्यपदी घेत पुन्हा सभापती बनविण्यासाठी घेण्यात आलेला ठराव जिल्हा उपनिबंधकांनी अवैध ठरविल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संचालक आशिष पिपरे यांनी अवैध ठराव घेणाऱ्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चामोर्शी बाजार समितीत अतुल गण्यारपवार गटाने बाजी मारली होती. सभापतीपदी अतुल गण्यारपवार यांची निवडदेखील करण्यात आली. मात्र, त्यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांचा निवडणूक अर्ज अवैध ठरविला होता. त्यानंतर बुधवारी संचालक मंडळाने अतुल गण्यारपवार यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करून त्यांना पुन्हा सभापती बनविण्यासाठी एकमताने ठराव घेतला. परंतु स्वीकृत सदस्याची सभपातीपदी निवड करता येत नसल्याने जिल्हा उपनिबंधकांनी हा ठराव अवैध ठरविला. त्यामुळे पुन्हा सभापती बनण्याचा गण्यारपवार यांचा प्रयत्न फसला आहे. याप्रकरणी विरोधी गटातील संचालक आशिष पिपरे यांनी अवैध ठराव घेणारे संचालक मंडळ आणि बाजार समितीचे सचिव यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कांबळे यांना विचारणा केली असता त्यांनी सभापतीपदाचा अर्ज अवैध ठरविल्याचे सांगितले.

हेही वाचा – लाडक्या बाप्पाचे आगमन १८ की १९ सप्टेंबरला, जाणून घ्या…

हेही वाचा – गडचिरोली : नक्षलवाद्यांची नवी रणनीती, दीर्घकालीन युद्धाचा इशारा, १९ वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकबाजी

बाजार समितीच्या निवडणुकांपासून सत्ताधारी गटाने अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन अवैधपणे निर्णय घेण्याचा सपाटा लावला होता. उच्च न्यायालयाने चपराक देत अर्ज रद्द केल्यानंतरही पुन्हा सभापती बनण्यासाठी गैरमार्गाचा वापर केला जात होता. मात्र, ठराव रद्द केल्याने शेवटी सत्याचा विजय झाला. आता याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे. – आशिष पिपरे, संचालक, चामोर्शी बाजार समिती

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High court canceled selection of chamorshi apmc chairman atul ganyarpawar but the resolution taken to make the chairman again is made invalid ssp 89 ssb