भंडारा : तुमसर तालुक्यातील वैनगंगा व बावनथडी नदीची वाळू उच्च गुणवत्तेची आहे. तिला मोठी मागणी असल्याने तस्करांनी नवीन शक्कल लढवून तंत्रज्ञानालाही आव्हान दिले आहे. वाळू वाहतुकी दरम्यान घाटापासून वाहतूक करणाऱ्या वाहनाला जिओ टॅगिंग लावणे गरजेचे आहे. ते दुचाकीला लावून ती महाराष्ट्राच्या सीमेत आणणे व त्यानंतर येथील ट्रक व टिप्परला हे जिओ टॅगिंग लावून नागपूर येथे वाळू नेली जात आहे. हा प्रकार मागील कित्येक महिन्यापासून सुरू आहे. हा प्रकार आमदार नाना पटोले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उचलल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वाळू चोरी प्रकरणात कॉल रेकॉर्ड सीडीआर तपासणी होणार असल्याने मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशी होते आंतरराज्य रेती चोरी …

महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा लागून आहेत. वैनगंगा व बावनथडी या दोन्ही नद्या दोन्ही राज्याच्या सीमेतून वाहतात. मध्यप्रदेशात वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. परंतु राज्याच्या सीमेतील घाटांच्या लिलाव न करता शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले. यामध्ये तुमसर तालुक्यातील उमरवाडा, पांजरा (रेंगेपार), मांडवी, सोंड्या, चारगाव, लोभी, आष्टी या सात डेपोच्या समावेश आहे. मात्र उमरवाडा डेपोला पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच तालुक्यातील इतर अनधिकृत रेती बावनथडी व वैनगंगा नदीपात्रातून उपसा सुरू आहे. वाळू वाहतुकीकरिता रॉयल्टी अनिवार्य आहे. मध्यप्रदेशातील घाटावर जाण्याकरिता ट्रक व टिप्परला मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे तस्करांनी तुमसर तालुक्यातील वाळू ट्रक व टिप्पर मध्ये भरणे सुरू केले.

दुचाकीला जिओ टॅगिंग …

रेतीचे वाळू व टिप्पर मध्यप्रदेशात न जाता ते महाराष्ट्राच्या सीमेतच थांबायचे. मध्यप्रदेशातील घाटातून दुचाकीला जिओ टॅगिंग लावून ती महाराष्ट्राच्या सीमेत आणण्यात येत आहे. त्यानंतर दुचाकीची जिओ टॅगिंग रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक व टिप्परला लावण्याच्या गोरखधंदा येथे केला जात होता.

विधानसभेत चर्चेनंतर खळबळ …

सोमवारी विधानसभेत आमदार नाना पटोले यांनी तुमसर तालुक्यातील वाळू प्रकरणाबाबत लक्षवेधी मांडली. आमदार पटोले यांनी तुमसर तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी या सर्व प्रकाराची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले. कॉल रेकॉर्ड सीडीआर तपासणीच्या धास्तीने येथील महसूल प्रशासनात मोठी हालचाल दिसत आहे. शासनाच्या महसूल विभागाचे अधिकारी यांचे आदेश येथे धडकल्याने तुमसर तहसील कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अधिकारी व्यस्त दिसले. सध्या तुमसर शहरातून जाणाऱ्या आंतरराज्य मार्गावर वाळू ट्रक व टिप्पर यांची वाहतूक नगण्य दिसली. या खेळात आता कुणाचा बळी जाणार याची चर्चा तुमसर येथे सुरू आहे.

महसूल प्रशासनाला १३ कोटींचे लक्ष्य

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत येथील महसूल प्रशासनाला १३ कोटींच्या महसूल जमा करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High quality sand from wainganga and bawanthadi rivers in tumsar is smuggled using new methods ksn 82 sud 02