नागपूर: मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह व सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी ११ महीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगीतले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पी.ए.ने मला पैसे मागीतले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाही. आता तोच आरोप करत आहे, खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबड्यावर राजकीय सुडबुध्दीने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली, असा प्रतिहल्ला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर केला. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

अनिल देशमुख यांनी सांगीतले की, न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना सुध्दा कोर्टात बोलविले होते. परंतु सहा वेळा समन्स पाठवून सुध्दा ते आले नाहीत. शेवटी त्यांचा पकड वॉरंट काढल्यावर त्यांनी वकीलाच्या मार्फत कोर्टात शपथपत्र लिहून दिले की, मी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले ते ऐकीव माहितीवर होते. त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत.

हेही वाचा: “भाजप कार्यकर्ता जिंकतो किंवा शिकतो, पराभूत होत नाही,” कोणी केली ही व्याख्या? वाचा…

न्यायमुर्ती चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाच्या चौकशीचा १४०० पानांचा अहवाल हा राज्य सरकारकडे २ वर्षांपूर्वी सादर केला आहे. परंतु दोन वर्षांपासुन तो अहवाल राज्य सरकार लोकांसमोर आणत नाही. यासाठी मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी विनंती केली. दोन वर्षापूर्वी हा अहवाल राज्य शासनाला सादर झाला त्यावेळी सर्वच वर्तमान पत्रांमध्ये अनिल देशमुख यांना न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अहवालात “क्लिन चिट” दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु या अहवालात मला “क्लिन चिट” दिल्यामुळे तो देवेंद्र फडणविस यांनी दडवून ठेवला आहे, असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

हेही वाचा: मेहकरात गर्भलिंग निदान, सोनाग्राफी केंद्राला टाळे; दोघे ताब्यात

दोन खुनाच्या गुन्ह्यांतील आरोपी सचिन वाझे आता देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर जुनाच तीन वर्षांपुर्वीचा आरोप करीत आहे. काल सांगीतल्याप्रमाणे मला जामीन देतांना उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगीतले की, सचिन वाझेवर २ खुनाच्या गुन्ह्याचे आरोप असल्यामुळे व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात माझ्या वकीलांनी जेव्हा त्याची उलट चौकशी केली तेव्हा त्याने स्पष्ट सांगीतले की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पी.ए.ने व कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पैसे मागीतले नाही किंवा मी दिले नाही. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर ३ वर्षांपूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने शासनाला सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा असे आवाहनही अनिल देशमुख यांनी केले.