Huge loss to farmers due to intrusion of wild elephants in Bhandara | Loksatta

भंडाऱ्यात रानटी हत्तींची घुसखोरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

हत्तींच्या आगमनामुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण आहे. विशेष म्हणजे, हत्ती रात्रीच नुकसान करतात आणि दिवसा त्यांचा थांगपत्ता लागत नाही.

भंडाऱ्यात रानटी हत्तींची घुसखोरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
भंडाऱ्यात रानटी हत्तींची घुसखोरी

अनेक वर्षांच्या कालखंडानंतर भंडारा जिल्ह्यांत रविवारी मध्यरात्री रानटी हत्तींच्या कळपाचे आगमन झाले. रानटी हत्तींनी शेतात प्रवेश करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. ऑगस्ट महिन्यापासून गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या तब्बल २३ रानटी हत्तींचा कळप भंडाऱ्यातील साकोली तालुक्याच्या महालगाव येथील जंगलात आला आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास हत्तींचा कळप भंडाऱ्यात दाखल झाला. सानगडी वनक्षेत्रातील झाडगाव, केसलवाडा, सिरेगाव गावाशेजारील शेतशिवारात रानटी हत्तींनी शेतातील धानाच्या पुंजणांची नासधूस केली.

हेही वाचा- नागपूर: परिचारिकांनी लावल्या काळ्या फिती, कामबंदही करणार, जाणून घ्या काय आहेत कारणे?

मागील काही दिवसांपासून गोंदियात वास्तव्य असलेल्या हत्तींचा कळप नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात यावा, यासाठी वनाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, रानटी हत्तींनी भंडाऱ्याच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली होती. सोमवारी पहाटे हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्याची सीमारेषा ओलांडली. पूर्व नागझिरा डोह जंगलात हत्तींचे वास्तव्य होते. गोंदियात हत्तीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महालगाव, वडद आणि शिपडी या गावातील लोकांनी हत्तींच्या कळपाजवळ जाऊ नये, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे. उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक राठोड, वनपरीक्षेत्राधिकारी संजय मेंढे, तहसीलदार कुंभरे व वनविभाग तथा महसूल विभागाची चमू सानगडी येथे तळ ठोकून आहे. हत्तींचा कळप नेमका गेला कुठे, याचा शोध घेतला आहे. महसूल व वनविभाग नुकसानीचे पंचनामे करीत असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्नरत आहे. हत्तींच्या आगमनामुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण आहे. विशेष म्हणजे, हत्ती रात्रीच नुकसान करतात आणि दिवसा त्यांचा थांगपत्ता लागत नाही. यामुळे वनविभागापुढे मोठे आव्हान आहे. शेतात खरीप पिकांसह आता नव्याने रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

हेही वाचा- महिलेने कानशिलात हाणल्यानंतरही प्रा. धवनकरची मग्रुरी कायम; खंडणी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

‘ड्रोन’च्या माध्यमातून हालचालींवर लक्ष

हत्तींचा कळप दिवसा जंगलात राहतो, रात्री त्यांची ये-जा सुरू असते. ‘ड्रोन’च्या माध्यमातून आम्ही हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. गावकऱ्यांनी सतर्क राहावे, वनाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन भंडारा वनविभागाचे (प्रादेशिक) उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 19:05 IST
Next Story
“आदित्य ठाकरे हे सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे बाळ, त्यांना….”; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका