नागपूर : मानव-वन्यजीव संघर्ष विकोपाला गेल्यामुळे मांसभक्षी प्राण्याने मारलेल्या जनावरावरच वीष टाकून त्या मांसभक्षी प्राण्याला मारण्याचे प्रकार जंगलालगतच्या गावांमध्ये होतात. त्याच धर्तीवर आता शहरातही मानव-श्वान संघर्ष सुरू झाला असून तीच वीषप्रयोगाची पुनरावृत्ती सुरू झाली आहे. वीषप्रयोग करुन कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाच्या विरोधात ‘सेव स्पीचलेस ऑर्गनायझेशन’ च्यावतीने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्वानांना रस्त्यावर खाऊ घालण्यावरुन उपराजधानीत दोन महिन्यांपूर्वी वाद उद्भवला होता. हे प्रकरण न्यायलयात देखील गेले. श्वानप्रेमी हरजित हे नेहमी श्वानांना खाद्य देत होते. त्यांच्या या सवयीमुळे कोराडी परिसरात श्वानांचा वावर वाढला. त्यामुळे परिसरातील चिडलेल्या एका नागरिकाने श्वानांना खाऊ घालण्यास मनाई करत त्यांना परिसरातून हटवण्याची मागणी केली. एवढेच नाही तर त्या सर्वांना वीष देऊन मारु टाकू, अशीही धमकी दिली. रविवारी सकाळी धमकी देणारा इसम कुत्र्याला कच्चे मांस देत असल्याचे एका श्वानप्रेमीला दिसले. श्वान ते मांस खात असल्याने या श्वानप्रेमीने ते उचलण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत श्वानाने ते मांस बरेच खाल्ले होते.

हेही वाचा >>> नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकराचा मुलीवर बलात्कार

तासाभरातच मांस खाणाऱ्या श्वानाला अचानक लाळ सुटू लागली आणि फेसाळलेल्या तोंडामुळे होणाऱ्या वेदनांनी तो ओरडू लागला. काही श्वानप्रेमींनी तातडीने सेव्ह स्पीच ऑर्गनयझेशनला माहिती दिली. संस्थेच्या संस्थापक स्मिता मीरे यांनी इतर कुत्र्यांनी ते राहिलेले मांस खाऊ नये म्हणून इतर श्वानप्रेमींना त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले व तातडीने पोलीसांना या घटनेची माहिती दिली. कुत्रा मरत असल्याने ताबडतोब त्याला श्वानांच्या दवाखान्यात आणले आणि त्याच्यावर उपचार सुरू केले. श्वानाची स्थिती अतिशय गंभीर होती. उपचाराला तो प्रतिसाद देत नव्हता. दुर्देवाने तो श्वान मरण पावला. त्यामुळे प्रमोद सोनकुसरे नामक व्यक्तीच्या विरोधात आयपीसी कलम ४२८ आणि पीसीए कायदा कलम ११(१) (सी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच या व्यक्तीला अटक करण्याची मागणी देखील सेव्ह स्पीच ऑर्गनायझेशनने पोलिसांकडे केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human wildlife conflict shocking dogs do not like use poison rgc 76 ysh