अमरावती : बकरी ईद साजरी करून छत्री तलावात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. शेख उमर लिलगर मेहबूब लिलगर (१९) व अयान शहा राजीक शहा (१६) दोघेही रा. कुंभारवाडा, फ्रेजरपुरा अशी मृतांची नावे आहेत. शेख उमर व अयान शहा हे दोघे बकरी ईद साजरी करून फिरायला छत्री तलाव परिसरात गेले होते. तेथे गेल्यावर ते पोहायला तलावात गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत राजापेठ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाला पाचारण केले. पथकाने दोन्ही मृतदेह तलावाबाहेर काढले. त्यानंतर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. ऐन बकरी ईदच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबावर आघात झाला आहे.
एकाच परिसरात राहणारे दोघेही बकरी इद साजरी करून ते पोहण्यासाठी गेले होते. मात्र, दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. ही माहिती मिळताच शोध व बचाव पथक दुपारी दोनच्या सुमारास छत्रीतलाव येथे पोहोचले. तात्काळ बचाव पथकामधील गोताखोरांनी गळ व हुकच्या साह्याने शोधकार्याला सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह पथकाच्या हाती लागले. ते मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनाकरीता पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. कुटुंबियांनी मृताची ओळख पटविली.
हेही वाचा : महिला भिंतीवर चढल्या अन् थेट न्यायाधीशांच्या बंगल्यात शिरल्या; पुढे झाले असे की…
दरम्यान दोन युवक बुडाल्याची माहिती मिळताच फ्रेजरपुरा परिसरातील अनेकांनी छत्रीतलाव परिसरात एकच गर्दी केली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथकातील सचिन धरमकर, दीपक डोरस, दिपक पाल, गजानन वाडेकर, विशाल निमकर, दिलीप भिलावेकर, आकाश निमकर, अर्जुन सुंदरडे, गणेश जाधव व दीपक चिल्लोरकर यांनी दोघांचे मृतदेह छत्री तलावाबाहेर काढले. यापुर्वीही अशा अनेक घटना छत्री तलावावर घडल्या आहेत. तीन महिन्यांपुर्वी अमरावती येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालयात शिकणारा एक विद्यार्थी त्यांच्या सहा ते सात मित्र, मैत्रीणींसह छत्री तलावावर सहलीसाठी गेला होता. या वेळी तीन विद्यार्थी पाण्यात पोहायला गेले. त्यावेळी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
© The Indian Express (P) Ltd