बुलढाणा : बुलढाणा अकोला जिल्ह्याच्या आणि मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या सुप्रसिद्ध वारी हनुमान संस्थान येथे आज धाडसी दरोडा पडला. अज्ञात दरोडेखोरांनी मंदिराच्या पुजारीला बांधून ठेवत मंदिरातील दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला .या परिणामी जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविकांत खळबळ उडाली असून जनमानस प्रक्षुब्ध झाल्याचे चित्र आहे. आज बुधवारी, पंधरा जानेवारीला उत्तररात्री हा थरारक आणि तितकाच धक्कादायक घटनाक्रम घडला आहे .घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी ,श्वान पथक, हस्त मुद्रा तज्ञ दाखल झाले आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून दरोडेखोरांचा युद्ध पातळीवर शोध घेण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेले वारी हनुमान हे मंदिर समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केल्याची वंदता आहे . वान प्रकल्प परिसरात निसर्ग रम्य परिसरात हे पुरातन जागृत असे हनुमानाचे मंदिर आहे. बुलढाणा, अकोला आणि विदर्भासह राज्यातील लाखो भाविक, पर्यटक इथे वर्षभर येतात. परराज्यातून देखील या ठिकाणी भाविक येत असतात. यामुळे या संस्थानात आज बुधवारी उत्तररात्री पडलेल्या दरोड्याने विश्वस्त आणि लाखो भाविकांना मोठा धक्का बसला आहे .

हेही वाचा : चंद्रपूर : सफाई कामगार, शिल्पनिदेशक पदांसाठी ३५ हजारांची लाच, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या…

दुर्गम भागातील या मंदिरावरील दरोड्याचा विस्तृत तपशील अजून प्राप्त झाला नाहीये.प्राप्त प्राथमिक माहितीनुसार दरोडे खोरांच्या सुसज्ज टोळीने पुजारीला धाक दाखवून बांधून ठेवले. यानंतर हनुमान , गणेश मूर्तीवरील मौल्यवान दागिने लंपास केले .यामध्ये हनुमान मूर्तीवरील दोन हार ,कंबरपट्टा, हातकडे, पैंजण, कान, मुकुट, छत्र गणेश मूर्तीवरील मुकुट चा समावेश आहे .तसेच दानपेटी सुद्धा फोडून त्यातील मोठी रक्कम दरोडेखोरानी लंपास केली आहे .हे दागिने आणि रोख रक्कम मिळून लाखोंचा ऐवज लुटण्यात आला आहे.प्राथमिक अंदाजनुसार कमीअधिक साडे पाच किलो चांदीचे दागिने व दान पेटीतील एक लाख रुपये घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केल्याचा अंदाज आहे .याची अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही. दुर्गम भाग असल्याने आणि मोबाईल संपर्क होत नसल्याने पोलीस अधीकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही .सोनाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, विविध पथके घटनास्थळी दाखल झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana robbery at wari hanuman temple jewellery stolen scm 61 css