चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता कक्षात एका नवजात बाळाची अदलाबदली झाली. बाळाच्या आईच्या सतर्कतेमुळे व जागरूक पालकामुळे हा प्रकार उघडकीस आला. वैद्यक महाविद्यालयातील भोंगळ कारभारामुळे हा प्रकार घडला. आई व वडिलांनी धावपळ केल्यानंतर त्यांचे बाळ त्यांना मिळाले.

जिवती येथील दीक्षिता सुबोध चिकटे हिची पाच दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती झाली. तिने कन्येला जन्म दिला. मात्र, मुलीचे वजन जन्मत:च कमी असल्यामुळे नवजात बाळाला नवजात शिशू अतिदक्षता कक्षात उपचारार्थ ठेवण्यात आले. तिथे दूध पाजण्यासाठी आईला बाळाजवळ नेण्यात येते व दूध पाजल्यानंतर पुन्हा प्रसूती कक्षात आणले जाते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास दीक्षिता चिकटे हिला बाळाला दूध पाजण्यासाठी नेण्यात आले. मात्र, बाळ काही केल्या दूध पित नव्हते. दीक्षिताने परिचारिकेला बाळ दूध पित नाही, काही अडचण आहे काय अशी विचारणा केली. मात्र, परिचारिकेने उडवाउडवीची उत्तरे दिली. दीक्षिता हिला काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. कारण दीक्षिताच्या मुलीचा रंग गोरा व डोळे निळ्या रंगाचे होते. त्यामुळे तिने लंगोटी उघडून बघितली असता बाळ बदलले होते. तिच्याकडे मुली ऐवजी नवजात मुलगा देण्यात आला होता. तसेच त्याचा रंगही काळा होता.

हेही वाचा : शेती वाटणीच्या वादातून चार जणांची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील तीन जणांना फाशीची शिक्षा

दीक्षिताने लगेच पती सुबोधला फोन करून बाळ अदलाबदली झाल्याची माहिती दिली. बाळ बदलले कळताच वडील रुग्णालयात धावत पोहचले आणि तिथेच आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी डॉक्टर व परिचारिकेने बाळ तुमचेच आहे, तुम्ही पागल झाल्या का असे म्हणून दीक्षिताला मूर्खात काढले. मात्र, पाच दिवसाचे माझेच बाळ मी कशी विसरणार असे म्हणून परिचारिका व डॉक्टरलाच प्रतिप्रश्न केला. बाळाच्या पायाला लावण्यात आलेला नावाचा टॅग देखील बदललेला होता. या प्रकारानंतर बराच गदारोळ झाल्यानंतर सुबोध चिकटे याने थेट तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर संबंधित डॉक्टर व परिचारिका हादरले व सारवासारव करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : नागपूर : तरुण जोडप्याला लुटणाऱ्या ‘त्या’ पोलीसांना अटकपूर्व जामीन…

दरम्यान, बाळ बदलले काय म्हणून तपासणी केली असता खरच बाळ बदलले होते. नवजात मुलगी व मुलगा आजूबाजूला ठेवण्यात आले होते. त्यामुळे ही गडबड झाल्याचे लक्षात येताच नवजात मुलगी दीक्षिताकडे सोपवण्यात आली व ज्या महिलेचे नवजात बाळ होते तिच्याकडे ते सोपवण्यात आले. जवळपास तीन ते चार तास हा गोंधळ वैद्यक महाविद्यालयात सुरू होता. तक्रारीनंतर रुग्णालयात पोलीस पथकासह सहायक अधिष्ठाता डॉ. मंगम, डॉ. फालके, डॉ. अमोल भोंगळे दाखल झाले. यावेळी सुबोध चिकटे याने घडलेला प्रकार सांगितला. त्यावर डॉक्टरांनी चिकटे यांची लेखी तक्रार घेतली. याप्रकरणी संबंधित डॉक्टर व परिचारिका यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन डॉक्टर मंगम यांनी दीक्षिता व सुबोध चिकटे यांना दिले.