चंद्रपूर : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस सुरू आहे. रविवार शहरात संततधार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह वाढला आहे. अनेक छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे मार्ग बंद झाले आहे. शहरातील महाकाली कालरी संकुलाला जोडणाऱ्या पुलावरून कार वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सुदैवाने कारमधील दोन जण थोडक्यात बचावले. जिल्ह्यात २० जुलैपासून सतत पाऊस सुरू आहे. एकही दिवसांची उघडीप न देता पाऊस सुरू असल्याने नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. इरई धरणाचे दरवाजे सातत्याने उघडले जात असल्याने इरई व झरपट नदीला देखील पाणी आहे. तर अनेक छोटे मोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी चंद्रपूर शहरात संततधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सर्वदूर सूरू असतांना लालपेठ परिसरातील एका नाल्यातून कार वाहून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणारी झारपाट नदी दुथडी भरून वाहत आहे. वेकोलि महाकाली कालरीला जोडणाऱ्या स्मशानभूमीजवळील झारपाट नदीच्या छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे. एका कार चालकाने वाहत्या पाण्यातून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गाडी कल्व्हर्टवरून वाहू लागली. वाहनातून प्रवास करणाऱ्या दोघांनीही सावधपणे कर्बवरून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र कार पाण्याच्या प्रवाहात वाहत राहिली. घटनास्थळी उपस्थित लोकांकडून सांगण्यात येत आहे की, कारमध्ये दोन जण होते, त्यापैकी एकाने धोका पाहून खाली उतरले आणि दुसऱ्याने झाडाला लटकून आपला जीव वाचवला ही घटना समोर आली आहे ज्यामध्ये कार पाणी कसे वाहत आहे हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान पावस सतत सुरू असल्याने ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत. नदी नाल्यांना पूर आलेला असल्याने अनेक पुल पाण्याखाली आलेले आहेत. अशा वेळी दुचाकी, चारचाकी वाहन चालकांनी पूलावरून पाणी वाहत असतांना रस्ता ओलांडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिसांनी देखील एखाला रस्ता पूरामुळे बंद झाला असेल तर तिथे तातडीने बंदोबस्त तैनात करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. हेही वाचा : यवतमाळ : जुगार अड्डयावरील कारवाईला ‘नियमित तपासणी’चा मुलामा! ‘सोशल क्लब’वरील कारवाईबाबत प्रश्नचिन्ह घोडाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’, पर्यटकांना ‘नो एन्ट्री’ पावसाळी पर्यटनासाठी आकर्षण असलेले घोडाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. त्यामुळे आज पर्यटकांसाठी तलावाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला. वनविभाग व पोलीस प्रशासनाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत. घोडाझरी तलाव नागभीड तालुक्यात आहे. पावसाळ्यात पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतात. चंद्रपूर शहरातील महाकाली कालरी संकुलाला जोडणाऱ्या पुलावरून कार वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सुदैवाने कारमधील दोन जण थोडक्यात बचावले. pic.twitter.com/2ECaMh58Ds— LoksattaLive (@LoksattaLive) July 28, 2024 हेही वाचा : मुसळधार पावसाने गडचिरोलीत हाहाकार, तीन राष्ट्रीय महामार्गांसह ४१ मार्ग बंद अनोळखी इसमाचा मृतदेह मिळाला पाऊस सुरू असतानाच चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट बाहेरील माना टेकडीच्या खड्ड्यात एका ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह मिळाला आहे. मृताची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहे.