गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत आलेली ‘कमवा आणि शिका’ योजना वादात सापडली आहे. यातील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिकविण्यासाठी संघपरिवाराशी संबंधित विद्या भारती ही संस्था प्रशिक्षण देणार आहे. यावर काही सिनेट सदस्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदविला असून गरज नसताना विद्यापीठ एक विशिष्ट विचारधारा थोपविण्यासाठी नवी परंपरा सुरु करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
उच्च शिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करण्याच्या हेतूने दशकभरापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात वादाची मालिका सुरूच असून यात ‘कमवा आणि शिका’ योजनेची भर पडली आहे. विद्यापीठ प्रशासन ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना गडचिरोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवायला पाठवणार आहेत. त्यांना आधी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणाची जबाबदारी ‘विद्या-भारती’ या संस्थेवर सोपविण्यात आली आहे. संघ परिवाराच्या ज्या ३५ संघटना आहेत त्यापैकी ही एक आहे. ‘कमवा आणि शिका’ योजनेत विद्यार्थ्यांना विद्यापीठ परिसरातील कार्यालयात काही तासाचे काम दिले जाते. जेणेकरून विद्यार्थी आपले स्वत:चे वर्ग करू शकतील. पण विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाठवले तर ते आपले स्वत:चे वर्ग-प्रात्यक्षिक कधी करणार आणि संघ परिवाराशी संबंधित संस्था त्यांना कोणते प्रशिक्षण देणार, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात उपस्थित केल्या जात आहे. यापूर्वीही अशाच काही निर्णयांवरून विद्यापीठ प्रशासनाला प्रचंड टीका सहन करावी लागली होती. मागील आठवड्यात युगप्रवर्तक डॉ.हेडगेवार नाट्यप्रयोगावरूनही वातावरण चांगलेच तापले होते. हे विशेष.
“विद्यापीठात संघांचे प्रयोग”
कमवा आणि शिका ही योजना विद्यापीठातील गरजू विद्यार्थ्यांसाठी चांगल्या हेतूने सुरू करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना कुठेही प्रशिक्षण देऊन बाहेर पाठवणे अभिप्रेत नाही. तरीही विद्यापीठ प्रशासन संघाशी संबंधित संस्थेला यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी देऊन बाहेरील शाळांमध्ये पाठवीत आहे. हे सर्व संघाचे प्रयोग असून येणाऱ्या सिनेटमध्ये आम्ही हा प्रश्न मांडणार असल्याची प्रतिक्रिया सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी यांनी दिली आहे.