गडचिरोली : सत्ताधारी भारतीय जनता पक्ष दररोज खोटे दावे करत सुटला आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात २५ कोटी जनतेला गरिबीतून मुक्त केल्याचा दावा करण्यात आला होता. अशाप्रकारचे खोटे दावे करून मागास, आदिवासी, कष्टकरी गरीब जनतेला फसवून देशाला खासगीकरणाच्या दरीत लोटण्याचा प्रकार सुरू आहे. हे सर्व डोळ्यापुढे घडत असताना प्रमुख विरोधीपक्ष असलेला काँग्रेस पक्ष थेट भिडण्याऐवजी ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी मिळमिळीत भूमिका घेत आहे. इंडिया आघाडीत मित्र पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने असा गंभीर आरोप केल्याने काँग्रेसची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली शहरात प्रत्येक वार्डात शेतकरी कामगार पक्षाकडून शाखांची स्थापना करण्यात येणार असून १३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान “हर घर जोडो” अभियान राबविणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक, महिला व पुरुषांना पक्षाशी जोडण्याचा संकल्प पक्षाचे चिटणीस रामदास जाराते यांनी केला आहे. त्यानिमित्त सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणारे पत्रक काढून त्यांनी काही दावे केले आहे. त्यात त्यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ८० कोटी लोकांना ५ किलो मोफत राशन दिल्याचा आणि २५ कोटी जनतेला गरिबीतून मुक्त केल्याचा दावा अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केला आहे. हा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा देशातील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, युवक, बेरोजगार, छोटे दुकानदार, नोकरदारांची, गळचेपी करणारा आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव, आरोग्य, शिक्षणावरील कमी केलेली तरतूद, गरिबांना आणखी गरिबीच्या खाईत लोटणार आहे.

हेही वाचा : “असंगाशी संग केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती बिघडली”, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची टीका; म्हणाले, “त्यांची उंची आणि पात्रता…”

सर्व क्षेत्रातील पराकोटीचे खासगीकरण येणाऱ्या पिढ्यांच्या उरावर बसणार असून गरिबांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य, नोकरी, रोजगार मिळणे बंद होणार आहे. या संपूर्ण अराजकतेविरुद्ध देशातील प्रमुख विरोधी असलेला काँग्रेस पक्ष जनतेसोबत लढा उभारायचा सोडून ईडी-सीबीआय च्या धाकाने मिळमिळीत भूमिका घेऊन शांत बसलेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांनाही पक्ष फुटीने ग्रासलेले असून जनतेच्या प्रश्नांपेक्षा ते स्वतःच्या अस्तित्वाच्या संघर्षात गुरफटले आहे. देशापातळीवरील या परिस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्याला याची झळ बसणार असून ही समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नसल्याची टिका शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुंबई येथे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी गेले होते. तेथे त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती, हे विशेष.

हेही वाचा : “मुख्यमंत्री कार्यालय गुंडांना सुरक्षित वाटते काय?”, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

यासंदर्भात शेकापचे चिटणीस रामदास जराते यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्ही ‘इंडिया’ आघाडीत जरी असलो तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे पक्षाचा विस्तार करणे आमचा अधिकार आहे. राहिला प्रश्न काँग्रेस आणि मित्र पक्षावर टीकेचा तर जी वास्तविकता सर्वांना दिसून येत आहे. तीच आम्ही मांडली. ‘शेकाप’च्या आरोपावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, कोणत्याही धमक्यांना भीक न घालता देशात राहुल गांधी यांनी उघडपणे भाजप विरोधात यात्रा काढली आहे. त्यामुळे एखादा नेता घाबरला म्हणजे पक्ष होत नाही. मित्र पक्षांनी कोणतीही चर्चा न करता अशाप्रकारची उघड भूमिका घेणे योग्य नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli shetkari kamgar paksh said that congress weak due to fear of ed cbi raids ssp 89 css
First published on: 10-02-2024 at 15:58 IST