गोंदिया: नागपूर-रायपूर पॅसेंजर गाड़ीमध्ये भीक मागण्याच्या बहाण्याने गाडीत प्रवेश करीत दोघांनी महिला प्रवाशांची लुटमार करून इतर ही प्रवाशांना दमदाटी केल्याचा गंभीर प्रकार शनिवारी घडला. घटनेनंतर प्रवाशांचा रोष वाढताच सालेकसा रेल्वे स्थानकावर उतरून त्या दोघां ही लुटारूंनी पळ काढला.

इतवारी ते रायपूर या पॅसेंजरमध्ये आमगाव पर्यंत जास्त प्रवासी असतात. त्यानंतर संख्या कमी होत जाते. शनिवारी धानोली स्थानकावर दुपारी १:३५ वाजता दरम्यान सालेकसाच्या बाबाटोली येथील दोन व्यक्ती भिक मागण्याच्या बहाण्याने गाडीत शिरले. यावेळी डब्यात मोजकेच प्रवासी होते. त्यात महिलांचा समावेश होता. त्यांनी गाडीत शिरल्या बरोबर भीक मागणे सुरू केले. महिला प्रवाशांना एकटी बघून त्यांना दमदाटी करून पैसे हिसकावून घेतले. तर काहींचे मोबाईल देखील चोरून नेले. दरम्यान काही पुरुष प्रवाशांनी प्रतिकार केला असता त्यांना मारहाण देखील केली. यादरम्यान रेल्वे २:५० वाजताच्या सुमारास सालेकसा रेल्वे स्थानकावर पोहोचली असता प्रवाशांनी आरडा ओरड केली असता त्या दोघांनीही खाली उतरून पळ काढला.

या मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांत पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. दरम्यान सालेकसा येथील स्थानिक महिला व इतर प्रवाशांच्या तक्रारी वरून सालेकसा रेल्वे पोलिसांनी घडलेल्या या गंभीर प्रकारा कडे लक्ष घालून सदर दोघे ही आरोपींची स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक एस. सिंग यांनी सांगितले.

पिकअप वाहन उलटून महिला ठार, तीन जखमी

लग्न कार्यक्रमात स्वयंपाक करून मालवाहकात वाहनाने आमगावकडे परतणाऱ्या स्वयंपाकी महिलांपैकी एका महिलेचा वाहन उलटून मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. ही घटना आमगाव ते देवरी मार्गावरील बोरकन्हार येथे शनिवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. अतूल फंतू ठाकरे (३० रा. आमगाव) हे कॅटरिंगचा व्यवसाय करतात. शनिवारी राकेश सुखदेव चुटे (आमगाव) याच्या (एमएच ०३, डीसी १४८८) क्रमांकाच्या पिकअप वाहनाने सालेकसा तालुक्यातील बापुटोला येथे लग्नसमारंभात स्वयंपाक करण्याकरिता गेले होते. लग्न आटोपल्यानंतर रात्री २ वाजताच्या सुमारास त्याच पिकअप वाहनाने आमगावकडे परत येत होते.

दरम्यान वाहन चालकाने भरधाव वेगात वाहन चालविल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. दरम्यान पिकअपमध्ये बसलेली महिला सेवंता खेमराज चुटे (६०) रा. काली मंदिरजवळ आमगाव या महिलेचा घटना स्थळावरच मृत्यू झाला. तर रादन भरतराम शहारे (६३) रा. बनगाव, निर्मला रोशन नेवारे (६०) रा. बनगाव आणि अतुल फंतू ठाकरे (३०) रा. आमगाव हे गंभीर जखमी झाले आहेत. अतुल ठाकरे याच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी चालक राकेश सुखदेव चुटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास आमगावचे पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.