नागपूर : कुख्यात डॉन छोटा राजन याच्या मुंबईतील घरासह देशभरात २१३ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी त्याच्या साथीदारासह अटक केली. त्याने रामदासपेठ येथील प्रसिद्ध हॉटेलमालकाच्या घरात चोरी करून हिऱ्याचा हार व इतर वस्तू असा एकूण १८ लाख रुपयाचा मुद्देमाल पळवला होता. गुन्हे शाखेच्या घरफोडी प्रतिबंधक पथकाने आरोपीला हैदराबाद येथून अटक केली. मोहम्मद सलीम मोहम्मद हबीब कुरेशी (५१) रा. रंगारेड्डी, हैदराबाद आणि शब्बीर उर्फ साबिर जमील कुरेशी (३२) रा. गोवंडी, मुंबई, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामदासपेठच्या निर्मल गंगा अपार्टमेंटमध्ये राहणाऱे राजेंद्र कामदार यांच्या घरी २६ मार्च रोजी चोरीची घटना घडली होती. राजेंद्र हे नैवेद्यम ग्रूपचे संचालक आहेत. ते पत्नीसह न्यूझीलँडला गेले होते. सलीम २५ वर्षांपासून घरफोडीत सक्रिय आहे. साबिर हा सुद्धा सराईत चोरटा आहे आणि गत काही वर्षांपासून सलीमसोबत सक्रिय आहे. दोघेही कारने नागपुरात आले. एका लॉजमध्ये थांबून पॉश परिसरातील बंद घरांचा शोध घेऊ लागले. निर्मल गंगा अपार्टमेंटची टेहळणी करताना त्यांना कामदार यांच्या घराच्या दारात काही वृत्तपत्र पडून असल्याचे दिसले. घरालाही कुलूप होते. दोघांनीही चोरीची योजना बनवली. दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील दागिने आणि रोख ४.५० लाख रुपये चोरी करून पसार झाले.

हेही वाचा : नागपूर: कर्मचाऱ्यांना नि:शुल्क उपचार, दिव्यांगांसाठी केंद्रावर व्हीलचेअर

तक्रारीनंतर सीताबर्डी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकानेही तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस लॉजपर्यंत पोहोचले. तेथून आरोपींचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर मिळवला. त्यांचा शोध घेत पोलीस हैदराबादला पोहोचले. मात्र, सलीम पोलिसांपासून वाचण्यासाठी घर सोडून एका धार्मिक ठिकाणी राहत होता. योजनाबद्धरित्या पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी नागपुरात चोरी करून हैदराबादला गेले होते. तेथून मुंबईला गेले आणि चोरीचे दागिने एका सराफाला विकून परत हैदराबादला परतले, अशी माहिती चौकशीतून समोर आली. पोलिसांनी आरोपींकडून कार आणि दोन फोन जप्त केले आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कबाडी यांच्या पथकाने केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur a burglar who did burglary at 213 houses including don chhota rajan s house arrested adk 83 css