नागपूर: रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, माजी खासदार आणि दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष रा.सू. उपाख्य रामकृष्ण सूर्यभान गवई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. ते सरन्यायाधीश भूषण गवई यांचे वडील. रा. सू. गवई हे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष असताना नागपूरमधील प्रसिद्ध अशा डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची स्थापना झाली. मात्र, काही वर्षांपासून स्मारक समितीमध्ये वाद सुरू आहे. डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील अशाच एका प्रकरणात आता थेट सरन्यायाधीशांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयामधील एका प्राध्यापिकेच्या मानसिक छळाच्या तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आता विविध सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका अरुणा सबाने यांनी या प्रकरणात थेट सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे तक्रार केली आहे. ई-मेलच्या माध्यमातून ही तक्रार पाठवली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून स्त्रीयांना दिलेल्या समान अधिकाराचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे.

प्राध्यापिकेने ज्येष्ठ कर्मचारी डॉ. अरुण जोसेफ (६६) आणि स्मारक समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक रवी मेंढे (६०) यांच्याविरोधात मानसिक छळाची तक्रार दिली. मात्र, विविध माध्यमातून दबाव टाकून हे प्रकरणात दाबले जात असल्याने सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सबाने यांनी तक्रार पत्रामध्ये प्राध्यापिकेची संपूर्ण बाजू सरन्यायाधीशांकडे मांडली आहे.

पीडितेने या प्रकरणाची तक्रार महाविद्यालयीन समितीकडे केली. परंतु कुठल्याच प्रकारची कार्यवाही मेंढे आणि जोसेफ यांच्यावर झालेली नाही. हे दोघेही महाविद्यालयांमध्ये नियमित कर्मचारी नाहीत. तरीही ते सहयोगी प्राध्यापिका सारख्या जबाबदार पदावर असलेल्या आणि आपल्या विषयात तज्ज्ञ असलेल्या महिलेसोबत अशा असभ्य भाषेत कसे काय बोलू शकतात?, या महाविद्यालयात कार्यरत नसलेल्या दोन पुरुषांना कमिटीतले लोक का घाबरतात? दीक्षाभूमीसारख्या पवित्र प्रांगणामध्ये असलेल्या महाविद्यालयात अशा प्रकारचे कृत्य होत असेल तर यावर काय बोलायला पाहिजे?, असे अनेक प्रश्न आपल्या पत्रात केले आहेत.

काय आहे प्रकरण?

पोलिसात दाखल तक्रारीनुसार, पीडित महिला डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापिका आहे. त्या २० मे २०२५ रोजी महाविद्यालयात आवक जावक शाखेत पदोन्नती संदर्भात लेखी अर्ज देण्यासाठी गेल्या असता डॉ. अरुण जोसेफ यांनी पत्र स्वीकारण्यास नकार दिला. पीडिता आणि कर्मचारी यांची चर्चा सुरू असतानाच जोसेफ त्यांच्या अंगावर धावून गेला. अश्लील हातवारे करीत शिवीगाळ केली. सर्वांसमोर अपमानित केले. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची महाविद्यालयाच्या समितीकडेही तक्रार झाली. परंतु, कारवाई करण्यात आली नाही. अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक म्हणून रवी मेंढे प्रशासकीय कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आहे. अध्यक्षांनीच परवानगी दिल्याचे तो सर्वांना सांगत असतो. मेंढेने अशाच पद्धतीने महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेला जाळ्यात ओढून लग्न केल्याचीही चर्चा आहे.