नागपूर : खामला येथील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग २ कार्यालयाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली होती. कार्यालयातील ड्रॉवरमध्ये पाच हजार रुपये आढळून आले होते. या प्रकरणात सहाय्यक दुय्यम निबंधक अ. तु कपले यांना निलंबित करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी खामला येथील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग २ कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती. खामला भागातील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग २ कार्यालयाबाबत आलेल्या गंभीर तक्रारीची दखल घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही अनपेक्षित भेट होती या पाहणीत एका अधिकाऱ्याच्या टेबलमधील ड्रॉवरमध्ये रोख रक्कम आढळून आली. याबाबत त्यांनी पोलिसांना योग्य तो तपास करण्याचे निर्देश दिले.

नागरिकांना जर कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच अथवा इतर कशाची मागणी केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. आज संबंधित अधिका-यांला निलंबित करण्यात आले. भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारची शून्य-सहिष्णुतेची भूमिका आहे. कुणीही नागरिकांकडून लाच मागितल्यास, तक्रार न घाबरता करा. पारदर्शक प्रशासन हेच आमचे ध्येय आहे. राज्यात महसूल विभाग अधिक जबाबदार आणि जनतेसाठी सुलभ करण्यासाठी पुढील काही दिवसांत सर्व उपनिबंधक कार्यालयांवर विशेष तपास मोहिमा राबविण्याचे संकेत बावनकुळे त्यांनी दिले आहे