नागपूर : गेल्या काही दिवसांत उन्हाची काहिली वाढली आहे. चौकातील सिग्नलवर थांबले असता वाहनचालकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नागपूरकरांना उन्हापासून दिलासा मिळावा, या उद्देशाने महापालिकेने आता विविध चौकातील सिग्नलवर ‘ग्रीननेट’ लावल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना, विशेषत: दुचाकीवरून प्रवास करणा-यांना हिरव्या नेटमुळे सिग्नलवर सावलीचा आधार मिळतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेने गेल्या वर्षी उन्हाळ्यात शहरातील काही भागात हा उपक्रम राबविला होता. त्याला नागरिकांकडून व विविध समाजसेवी संस्थाकडून प्रतिसाद मिळाला होता. येणाऱ्या दिवसात नवतापाच्या कालावधीत उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने रिझर्व्ह बँक चौक, जीपीओ चौक, लॉ कॉलेज चौक, शंकरनगर आणि मानेवाडा चौकात ‘ग्रीननेट’ लावले त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उन्हापासून थोडा दिलासा मिळाला असला तरी सध्या उकाडा जास्त आहे. या हिरव्या नेट लावल्यानंतर आता सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रुंद रस्त्यांवर हे लावण्यात आलेले नेट अबाधित ठेवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

हेही वाचा >>>उपराजधानीत मेंदूमृत अवयवदात्यांची संख्या दीडशेवर; चालू वर्षात उच्चांकाकडे वाटचाल

यासंदर्भात महापालिकेच्या वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधडे यांनी सांगितले, वाहनचालकांना उन्हापासून वाचवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. आरबीआय चौकात विधानभवनाकडे येणारी वाहतूक आणि त्याच्या विरुद्ध बाजूने ‘ग्रीननेट’ लावण्यात येणार आहे. शंकरनगर चौकात डब्ल्यूएचसी रोडच्या दोन्ही बाजूला ‘ग्रीननेट’ लावण्यात येणार आहे. मानेवाडा चौकातही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यापूर्वी शहरातील टेकडी गणेश मंदिरासह साई मंदिर, बालाजी मंदिर येथे भाविकांना उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून मंदिर परिसरात हिरवी नेट लावत स्प्रिकलरद्वारे थंडावा निर्माण करण्यात आला आहे. शहरातील विविध भागातील बाजारपेठेत आणि वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांसाठी पाणपोई (प्याऊ) सुरू करण्यात आली आहे . त्यामुळे रस्त्याने फिरणाऱ्या अनेकांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळा बघता वाहतूक सिग्नलवर वाहनधारकांची होणारी अस्वस्था दूर करण्यासाठी हिरवी नेट बसविण्याचे विविध पर्यावरणवादी व सामाजिक संघटनांनी स्वागत केले असून हा उपक्रम शहरातील विविध भागातील चौकात राबविला गेला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur the municipal corporation has now installed green nets on signals at various intersections amy