वाशीम : जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, नापीकी, कर्जबाजारी पणा तसेच पिकलेल्या मालाला योग्य भाव नसणे आदी कारणांनी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जिल्ह्यात मोठे आहे. सरत्या वर्षात ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर चालू वर्षातील केवळ ४ महिन्यात १८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. मात्र यापैकी बहुतेक शेतकरी आत्महत्या अपात्रतेच्या फेऱ्यात अडकल्याने मृत्यू नंतर ही कुटुंबियांना मदत मिळत नसल्याचे भीषण वास्तव आहे.

दिवसेंदिवस शेती करणे शेतकऱ्यांना त्रासदायक होत आहे. वर्षभर घाम गाळून काळ्या मातीतून सोन पीकविणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात सिंचनाची फारसी सुविधा नसल्याने अनेकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. कधी ओला दुष्काळ तरी कोरडा, खर्च अधिक व उत्पन्न कमी, शेतमालाचे घसरलेले दर, कर्जबाजारी पणा अशा अनेक कारणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या वर्षात ८३ शेतकरी आत्महत्या ची नोंद करण्यात आली. यामधून केवळ २८ शेतकरी आत्महत्या पात्र आहेत तर ४६ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. केवळ २७ आत्महत्या पीडित कुटुंबाना शासनाकडून मदत देण्यात आली आहे.

हेही वाचा : नागपूर : कारवाईऐवजी तडजोडीवर भर! पाच महिन्यांत फक्त ७०६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

अपात्र शेतकरी आत्महत्या चिंताजनक

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना मदत देण्यात येते , मात्र त्यासाठी ती आत्महत्या शासनाच्या नियमानुसार ‘पात्र’ असावी लागते. परंतु जिल्ह्यात झालेल्या बहुसंख्य आत्महत्या ह्या अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मयत होऊनही कुटुंबावर मदतीसाठी संघर्ष करावा लागत आहे.

हेही वाचा : डबल डेकर उड्डाणपुलामुळे कोंडी, नागपूरकर त्रस्त, विमानतळ चौकात…

शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रम

शेतकरी आत्मबल उन्नती कार्यक्रमाची व्याप्ती व विविध स्तरावर नियोजन करून जिल्हा आत्महत्या मुक्त करण्यासाठी शेतकरी आत्मबल कार्यक्रम हाती घेण्यात आला असून यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन शेतकरीच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व आत्महत्या थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.