यवतमाळ : बाहेरगावी एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास किंवा रुग्णालयात भरती व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा मृतदेह घरी नेण्याचा मोठा प्रश्न गरीब रुग्णांच्या नातेवाईकांसमोर उभा राहतो. अशावेळी शववाहिकेसाठी त्यांना मोठा खर्चही करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता पालकमंत्री संजय राठोड यांनी नातेवाईकांना मृतदेह वेळेत आणि विनामूल्य वाहतुकीद्वारे मिळावा यासाठी पुढाकार घेतला आणि पाच रुग्णवाहिका सेवेत दाखल झाल्या.

जिल्ह्यात मृतदेहांची वाहतूक विनामूल्य आणि वेळेवर होण्यासाठी दहा शववाहिका मंत्री संजय राठोड यांनी शासनाकडून मंजूर करून घेतल्या आहे. प्राप्त झालेल्या पाच शववाहिका यवतमाळ येथील विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात नगरपरिषदेला वितरीत करण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.सुभाष ढोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.कृष्णा बानोत, डॅा.क्रांतीकुमार नावंदीकर, डॅा.मधुकर मडावी, डॅा.संघर्ष राठोड तसेच पराग पिंगळे, श्रीधर मोहोड, हरिहर लिंगनवार आदी उपस्थित होते.

या शववाहिका पुणे येथून जिल्हा परिषद आरोग्य विभागास हस्तांतरीत करण्यात आल्या. ग्रामीण व शहरी भागातील मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी मृत व्यक्तिच्या नातेवाईकांना अनेकदा त्रास सोसावा लागतो. खासगी शववाहिका चालकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होते. नातेवाईकांना हा आर्थिक भुर्दंड पडू नये तसेच मृतदेहाची हेळसांड न होता मृतदेहाची वाहतूक लवकर व्हावी याकरीता सदर शववाहिकांचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत करण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक असते. अशा ठिकाणी मृत व्यक्तीस त्यांच्या गावी विनाखर्चाने व लवकर पोहचविता यावे, यासाठी उपजिल्हा रुग्णालये असलेल्या नगरपरिषदांना प्राधान्याने शववाहिका देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते.

पालकमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे नगपरिषद यवतमाळ, दारव्हा, पुसद, पांढरकवडा व दिग्रस नगर परिषदांना पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते शववाहिका वितरीत करण्यात आल्या. जिल्ह्यास अजून पाच शववाहिका प्राप्त होणार असून त्या लवकरच अन्य नगरपरिषदांचा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या शहरातून ग्रामीण भागातील गावांमध्ये या शववाहिकांमधून मृतदेह विनामूल्य पोहचविले जाणार आहेत. या वाहनांना स्वतंत्र चालक व वाहनांच्या देखभाल दुरुस्तीची तरतूद देखील करण्यात आली आहे.

नातेवाईकांची तारांबळ थांबेल

यवतमाळ जिल्हा विस्ताराने मोठा आहे. जिल्ह्यात १६ तालुके असून ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये किंवा जिल्हा रुग्णालयात येत असतात. गंभीर आजार किंवा अपघात व अन्य बाबींमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीस गावी घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांची तारांबळ होते. अशा दु:खद प्रसंगी त्यांना अधिक पैसे मोजून शववाहिका घ्यावी लागते. यात त्यांचा पैसा खर्च होतो. बरेचदा शववाहिका वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्ह्याला रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण आरोग्य मंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार पाच वाहने आपणास उपलब्ध झाले आहेत. उर्वरीत पाच शववाहिका लवकरच उपलब्ध होणार आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.